भारतात दरवर्षी ६० हजार लहान मुले बेपत्ता होतात. राष्ट्रीय गुन्हे शाखेच्या अहवालातील ही माहिती धडकी भरवणारी आहे. शालेय कालावधीत मुलांच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक आहे. आता मात्र, पाल्य आणि पालक एकमेकांपासून दूर असले तरी ‘पगमार्ग’ने ते एकमेकांशी जोडले जाणार आहेत. ही किमया हरीश अडतिया या एका नागपूरकर तरुणाने साध्य केली आहे. ‘पगमार्ग’मुळे शाळेतील पाल्याच्या प्रत्येक हालचालीची माहिती थेट पालकांच्या भ्रमणध्वनीवर पोहोचणार आहे.

मुलांजवळ सातत्याने राहणारी गोष्ट म्हणजे त्याचे ओळखपत्र. या ओळखपत्रातच ही यंत्रणा बसवण्यात आली असून त्याची जोडणी पालकांच्या भ्रमणध्वनीत आहे. जीपीएस आणि जीपीआरएस अशा दोन्ही तंत्रज्ञानांचा वापर यात करण्यात आला आहे. त्यामुळे मुलाने शाळेत प्रवेश केला आणि शाळेतून बाहेर पडला तरीही त्याचे संदेश पालकांच्या भ्रमणध्वनीवर पोहोचतील. हे ओळखपत्र देशविदेशात सोबत बाळगले, तरीही ते कार्यरत राहील. पगमार्ग एक अशी प्रगत, बुद्धिमान, सुरक्षित यंत्रणा आहे. यातून पाल्य कुठे आहे, अडचणीत तर नाही ना, याची सर्व माहिती क्षणाक्षणाला पालकांच्या भ्रमणध्वनीवर येते. पाल्य आणि पालक यांच्यातील संवादाची सुविधादेखील यात आहे. यात पालकाने  पाल्यांच्या यंत्रणेवर संपर्क साधल्यानंतर आजूबाजूची परिस्थिती पालकांना कळेल. अडचणीत सापडल्याची जाणीव झाल्यानंतर आयकार्डमधील ‘एसओएस’चे बटन  दाबले तर लगेच त्या ठिकाणासह पालकांच्या भ्रमणध्वनीवर संदेश जातील. बटन नाही दाबले तरीही असुरक्षित झोनमध्ये प्रवेश केल्याबरोबर त्या ठिकाणासह संदेश जातील. विशेष म्हणजे, ओळखपत्रात अशी काही यंत्रणा आहे, याचा अंदाजही कुणाला येत नाही.

‘पगमार्ग’चा वापर उपराजधानीतील एका शाळेत सुरू झाला आहे. हरीशने स्टार्टअपअंतर्गत ‘एअरवॅट कार्पोरेट सर्व्हिसेस’ ही कंपनी सुरू  केली असून त्याच्या या नवकल्पनेत मित्रही सहभागी झाले आहेत. ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्या सुरक्षेसाठीही अशाचप्रकारची यंत्रणा तयार करण्याचे काम सुरू आहे.

कुश कटारिया, युग चांडक यासारखी प्रकरणे घडली तेव्हा मनातून मी हादरलो. टीसीएस मुंबईची लठ्ठ पगाराची नोकरी सोडून नागपुरात परतलो. मुलांच्या सुरक्षेची यंत्रणा तयार करण्याचे ठरवले. चार वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर ही यंत्रणा तयार झाली. पेटंट मिळाले. मुलांच्या सुरक्षिततेसाठी आपण काहीतरी करू शकलो याचे समाधान आहे.

– हरीश अडतिया, एअरवॅट कार्पोरेट सव्‍‌र्हिसेस.