माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी दहावीची परीक्षा यंदा पेपरफूट प्रकरणाने गाजत असतानाच याचे मूळ खासगी शिकवणी वर्गात असल्याची चर्चा आता पालकांमध्ये होऊ लागली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेपर सुरू होण्याच्या काही तास आधी काही शिकवणी वर्गात त्यांच्या विद्यार्थ्यांना हा पेपर उपलब्ध करून दिला जात असल्याची माहिती पुढे आली आहे.

यंदाची दहावीची परीक्षा पेपरफुटीमुळे पहिल्या दिवसापासून गाजत आहे. राज्यात आतापर्यंत बारावीच्या चार विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेच्या दिवशी ‘व्हॉट्सअ‍ॅप’ किंवा इतर माध्यमातून उपलब्ध झाल्या होत्या. शिक्षण मंडळाकडून पुरेशी काळजी घेतल्यानंतरही पेपर फुटतो कसा, असा प्रश्न आता पालकांकडून विचारला जातो आहे. शिकवणी वर्गात न जाता वर्षभर अभ्यास करून पेपर सोडविण्यास जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर यामुळे अन्याय होत असल्याची भावना पालक व्यक्त करत आहेत. नागपुरात अद्याप यासंदर्भात मंडळाकडे तक्रारी आल्या नसल्या तरी काही खासगी शिकवणी वर्गाकडे यासंदर्भात बोट दाखविले जात आहे.

शहरात खासगी शिकवणी वर्गाचे मोठे जाळे पसरले असून त्यांची वर्षभराची आर्थिक उलाढाल ही कोटय़वधी रुपयांच्या घरात आहे. विद्यार्थी मिळविण्यासाठी वर्गचालकांमध्ये कमालीची व्यावसायिक स्पर्धाही दिसून येत असून पेपरफुटीचे मूळ यातच दडले असल्याची चर्चा आता पालकवर्ग करू लागले आहेत. शहरातील अशाच काही नावाजलेल्या शिकवणी वर्गाचे नाव पेपरफुटीच्या संदर्भात घेतले जात आहेत. शहरात अनेक शाखा असलेल्या आणि दहावी, बारावी (बोर्ड आणि सीबीएससी)सह अभियांत्रिकीच्या प्रवेशपूर्व परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या शिकवणी वर्गाचे नाव पालकांच्या तोंडी आहे. छत्रपती चौकापासून तर मानेवाडय़ापर्यंत आणि हुडकेश्वरपासून तर इतरही काही ठिकाणी या शिकवणी वर्गाच्या शाखा आहेत. येथे शिकवणी लावणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दिवशीही सकाळी तयारीसाठी बोलाविले जाते व त्यांच्याकडून त्याच दिवशीचा सॅम्पल पेपर सोडवून घेतला जातो. विशेष म्हणजे, या ‘सॅम्पल’ पेपरमधील बहुतांश प्रश्न हे त्याच दिवशी होणाऱ्या मंडळाच्या प्रश्नपत्रिकेत सुद्धा असतात, असे आढळून आले आहे. हा योगायोग आहे की साटेलोटे अशी रास्त शंका घेण्यास वाव असून याप्रकरणी चौकशी होण्याची गरज काही पालकांनी व्यक्त केली आहे.

पेपरफूट अशक्य, मंडळाचा दावा

दहावी आणि बारावी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका अतिशय सुरक्षितपणे आणि सुरक्षेच्या संदर्भातील आवश्यक ती काळजी घेऊन परीक्षा केंद्रावर पेपर सुरू होण्याच्या अर्धा तास आधी पोहोचविण्याची व्यवस्था केली जाते. सीलबंद पाकिटात पेपर ठेवलेले असतात आणि पेपर सुरू होण्याच्या १० मिनिटापूर्वी शिक्षकांच्या उपस्थितीत पाकीट उघडले जाते. त्यामुळे पेपर फुटण्याची शक्यता उरत नाही. राज्यात इतर ठिकाणी पेपर फुटल्याच्या तक्रारी असल्या तरी नागपूर विभागात अशाप्रकारच्या तक्रारी नाहीत. काही शिकवणी वर्गाच्या माध्यमातून पेपर फोडले जात असल्याचीही तक्रार नाही, तशी तक्रार आल्यास आणि त्यात तत्थ्य आढळून आल्यास मंडळाकडून कठोर कारवाई केली जाईल, असे नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे सहसचिव राम चव्हाण यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.