खासगी शाळा पिळवणूक करीत असल्याचा आरोप

मुलांनी प्रवेशशुल्क भरले नाही म्हणून त्यांना बाहेर उभे केले जाते.. प्रवेशशुल्क परवडत नाही तर पाल्यांना दुसऱ्या शाळेत टाका, असे शेतकरी पालकाला सुनावले जाते.. शालेय बसचे शुल्क भरले नाही, म्हणून त्या पाल्याची बससेवा बंद करण्यात येते.. खासगी शाळांची ही दादागिरी कुठपर्यंत सहन करायची, असा सवाल उपस्थित करीत पालकांनी प्रवेशशुल्क वाढीविरोधात एल्गार पुकारला.

खासगी शाळांचे विविध शुल्क पालकांच्या आवाक्याबाहेर चालल्याने राज्यातील सर्व पालक एकत्र आले आहेत. त्याची सुरुवात उपराजधानीतून झाली असून गुरुवारी महाराजबागेत खासगी शाळांच्या मनमानी कारभाराविरोधात एल्गार पुकारण्यात आला. शेकडो पालक यावेळी उपस्थित होते. दरवर्षी वाढणाऱ्या शुल्काला आमचा विरोध आहे. मूलभूत किंमतीवर शुल्क वाढवले जात नाही, तर एकूणच शुल्क वाढवले जाते. हा छळ इथेच थांबत नाही तर शाळा व्यवस्थापनाच्या प्रकाशकांकडूनच शालेय साहित्य घेणे, अनिवार्य केले जाते. त्यामुळे बाजारात ४५०-५०० रुपयाला मिळणाऱ्या शालेय साहित्यासाठी साडेचार-पाच हजार रुपये मोजावे लागतात. उपराजधानीतील वर्धा मार्गावरील एका शाळेत तिसरी-चौथीतल्या मुलासाठी साठ हजार रुपये शुल्क भरावे लागते आणि जाण्यायेण्याकरिता शालेय बसचे १७ हजार रुपये अतिरिक्त भरावे लागतात. शाळा ट्रस्टच्या नावाने चालतात. त्यांना अनुदान मिळते, मग शाळांच्या शाखा कशा उभ्या राहतात, असा प्रश्न पालकांनी यावेळी केला. अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, कामठी येथूनही इमारत निधीसंदर्भात तक्रारी आहेत. इमारत निधी हा इमारत बांधताना किंवा नूतनीकरण करताना घ्यायला हवा, पण तो दरवर्षी घेतला जातो. शाळेचे शुल्क २०, २४, ३० टक्क्यांनी वाढतच आहे, याकडेही या पालकांनी लक्ष वेधले.

अशा आहेत मागण्या

*    दिल्ली आणि उत्तर प्रदेशात शाळांच्या शुल्काविषयी कायदे करण्यात आले आहेत आणि ते सर्व शाळांना लागू आहेत. महाराष्ट्रातही त्याच पद्धतीचे कायदे व्हावे.

*    नर्सरी ते दहावीपर्यंत एक निश्चित शुल्क संरचना असायला हवी.

*    शुल्कवाढीबद्दल तसेच गणवेश आणि शालेय साहित्य यासंदर्भात कायदा करावा.

रविवारी पुन्हा आंदोलन

मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले, पण अजूनपर्यंत काही झालेले नाही. गेल्या १५ दिवसांपासून सुरू झालेल्या या आंदोलनाअंतर्गत उद्या अमरावती, त्यानंतर अकोला आणि संपूर्ण महाराष्ट्रात रान पेटवले जाणार आहे. येत्या रविवारी पुन्हा नागपुरात आंदोलन करण्यात येणार आहे.

मुलगी डॉक्टर कशी होईल?

शिक्षणाची संपूर्ण यंत्रणाच चुकीची आहे. शाळा अक्षरश: पिळवणूक करत आहेत. या शुल्काच्या ओझ्याखाली बाप रडतो आहे, तो फक्त कुणाला दाखवत नाही एवढेच. बापालाही वाटते त्याची मुलगी डॉक्टर व्हावी, पण फी वाढीचे गणित पाहिल्यानंतर खरंच मुलगी डॉक्टर होईल का? व्यवस्थापनाशी बोलणी करायला गेले तर ते आवाज दाबून टाकतात. मध्यमवर्गीयांचे यात सर्वाधिक मरण आहे. म्हणून सर्व कामे बाजूला सारून आम्ही पालक एकत्र आलो आहोत.

– योगेश पाथरे, पालक