रुग्णाचे पाल्य शिकत असलेल्या शाळेतून विद्यार्थ्यांना घरी नेले; १४ व १६ मार्च रोजी होणारी सराव परीक्षा लांबणीवर

नागपूर : अमेरिकेहून नागपुरात आलेल्या एका व्यक्तीला करोना झाल्याचे स्पष्ट होताच एका स्थानिक इंग्रजी वृत्तपत्राने संबंधित रुग्णाचे नाव प्रसिद्ध करण्याचा आगाऊपणा केला. यामुळे त्या रुग्णाचा मुलगा आणि मुलगी शिकत असलेल्या शाळा व महाविद्यालयाची ओळख उघड झाल्याने शाळांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. या रुग्णाची मुलगी शाळेत गेली नसतानाही केवळ भीतीपोटी पालकांनी तडक शाळा गाठून आपल्या पाल्यांना घरी नेले. दुसरीकडे मात्र रुग्णाचा मुलगा त्याच्या महाविद्यालयात जाऊनही तिकडे सर्व सुरळीत होते.

अमेरिकेहून परतलेली एक व्यक्ती करोनाबाधित असल्याचे बुधवारी रात्री स्पष्ट झाले. त्यानंतर या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला. मात्र, या रुग्णाचे नाव एका स्थानिक इंग्रजी दैनिकाने प्रकाशित केले. त्यामुळे सर्वत्र रुग्ण आणि त्याच्या कुटुंबाची माहिती उघड झाली. विशेष म्हणजे, करोना रुग्णाची माहिती गोपनीय ठेवण्याचे शासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत असतानाही असे घडले.  संबंधित रुग्णाची ओळख जाहीर झाल्याने सेंटर पॉईंट स्कूलमध्ये एकच गोंधळ उडाला.  काही वेळातच  पालकांकडून व्हॉट्स अ‍ॅपवर संदेश फिरू लागले. अनेक पालकांनी शाळा गाठत आपल्या पाल्यांना घरी नेले. शाळा प्रशासन आणि पालकांमध्येही या प्रकरणावरून काहीवेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. सतर्कता म्हणून संबंधित रुग्णाच्या मुलीला शाळेत न येण्याच्या सूचना आधीच दिल्याचे शाळा प्रशासनाकडून पालकांना सांगण्यात आले. असे असतानाही  पालकांनी आपल्या पाल्यांना घरी नेले. त्यामुळे काही वेळातच शाळा रिकामी झाली.  विशेष म्हणजे, या शाळेमध्ये सीबीएसई इयत्ता दहावीचे परीक्षा केंद्र असून गुरुवारी पेपरही होता. हा पेपर नियोजित वेळी सुरू होऊन सुरळीत पार पडल्याची माहिती आहे. अनेक परीक्षार्थ्यांनी ‘मास्क’ घालून परीक्षा दिली. या प्रकाराबाबत शाळा प्रशासनाशी अनेकदा संपर्क साधला. परंतु  कुणीही बोलायला तयार नव्हते.

’ रुग्णाचा मुलगा नागपुरातील रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत त्याच्या वडिलांना करोना झाल्याची माहितीच नसल्याने बुधवारी सकाळी तो महाविद्यालयात गेला होता. मात्र, गुरुवारी सकाळी रुग्णाची ओळख समोर आल्याने या विद्यार्थ्यांची ओळखही समोर आली. यामुळे बी.ई. प्रथम वर्षांचे वर्ग आणि १४ व १६ मार्च रोजी होणारी सराव परीक्षाही समोर ढकलण्यात आली.

नाव प्रसिद्ध केल्यास कारवाईचा इशारा

करोना हा आजार आहे आणि तो कुणालाही होऊ शकतो. रुग्णाची नावे प्रसिद्ध झाल्यास त्यांच्यावर बहिष्कारासारखे वाईट प्रसंग ओढवतात. ते घडूनये म्हणून रुग्णांची नावे प्रसिद्ध करू नये, अन्यथा कारवाईही केली जाऊ शकते, असा इशारा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिला आहे.