स्कूलबसमध्ये जीपीएस, सीसीटीव्ही यंत्रणा

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्कूलबस किंवा व्हॅनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा, जीपीएस यंत्रणेची सक्ती करण्यात आली असली तरी त्याचा भुर्दंड हा पालकांच्या खिशावरच पडणार आहे. वर्षांला एक हजार रुपये त्यांना अतिरिक्त मोजावे लागणार आहे.

जिल्हा शालेय स्कूलबस समिती आणि प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने प्रत्येक स्कूलबस आणि स्कूलव्हॅनमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही आणि जीपीएस यंत्रणा लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत शहरातील दिल्ली पब्लिक स्कूल, सेंटर पॉईंट स्कूलसह बहुतांश सीबीएसई शाळांच्या वाहनांमध्ये या यंत्रणा लावण्यात येत आहेत. शाळेला सेवा देणाऱ्या खासगी स्कूलबस आणि व्हॅनमालकांनी मात्र सध्या याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांनाही यासाठी आरटीओकडून सक्ती केली जाणार आहे. त्यामुळे आज ना उद्या सर्वानाच ही यंत्रणा कार्यान्वित केल्याशिवाय पर्याय नाही. बस किंवा व्हॅनमध्ये सीसीटीव्ही किंवा जीपीएस यंत्रणा लावायची असेल तर प्रतिवाहन सुमारे पंचवीस हजारापर्यंतचा खर्च येतो. एका बसमध्ये २५ ते ५० विद्यार्थी बसू शकतात. त्यांच्यात हा खर्च विभागला जाईल, परंतु केवळ १३ विद्यार्थ्यांच्या बसण्याची क्षमता असलेल्या स्कूलव्हॅनमध्ये मात्र हा खर्च अधिक येण्याची शक्यता आहे.

हा वाढीव खर्च पालकांकडूनच वसूल करण्यात येणार आहे. स्कूलबसने जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांकडून शाळा एक ते दीड हजार किंवा त्यापेक्षा जास्त शुल्क आकारते. दरवर्षी त्यात दहा ते पंधरा टक्के वाढ केली जाते. पेट्रोलचे दर वाढल्यास ही वाढ वीस टक्क्यांवर जाते. आता सीसीटीव्हीमुळे आणखी वाढ केली जाण्याची शक्यता आहे.

काही शाळांना त्यांच्या बसमध्ये प्राथमिक स्वरूपात ही यंत्रणा बसवल्यावर एक वर्ष देखभाल व दुरुस्तीचा खर्च द्यायचा नाही. त्यामुळे त्यातील काहींनी पहिल्या वर्षी विद्यार्थ्यांच्या स्कूलबसच्या शुल्कात वाढ न करण्याचाही निर्णय घेतला आहे. मात्र, दुसऱ्या वर्षी याही शाळेचे दर वाढण्याची शक्यता आहे.

३,११८ स्कूलबस

जिल्ह्य़ात एकूण ४ हजार ६० शाळा आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या एक हजार ५७९, नागपूर महापालिकेच्या १६४, नगर परिषदेसह नगरपालिकांच्या ६९, खासगी एक हजार १७८, खासगी विनाअनुदानित / कायम विना अनुदानित/ मदरशाच्या १ हजार, शासकीय २१ आणि इतर संवर्गातील ४९ शाळांचा समावेश आहे. ३ हजार ११८ स्कूलबस आणि व्हॅन विद्यार्थ्यांची ने-आण करतात. यात शहरातील १,९१८ तर ग्रामीणच्या १ हजार २०० बस, व्हॅनचा समावेश आहे.

मोबाईलवर माहिती

स्कूलबसच्या ठिकाणाची माहिती पालकांना त्यांच्या मोबाईलवर मिळणार आहे. बस येण्यापूर्वी पाच मिनिटे आधी, शाळा सुटल्यावर मुलांना निर्धारित ठिकाणी सोडण्याच्या वेळेआधी पाच मिनिटापूर्वी पालकांना संदेश येईल. बसमध्ये प्रवेश करताना आणि बाहेर पडताना मुलांना कार्ड स्वाईप करावे लागेल.

‘‘शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बस आणि व्हॅनमध्ये जीपीएस आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी वाहन मालकांना १५ ते २५ हजार रुपये खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे काही वाहनमालकांनी शुल्कवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यंत्रणेत वारंवार बिघाड होत असल्याने खर्च वाढला आहे.’’

 समर जोग, सचिव, स्कूलबस अ‍ॅण्ड स्टाफ असोसिएशन, नागपूर