|| देवेश गोंडाणे

 

शासनाच्या औपचारिकतेसाठी विद्यार्थी वेठीस; ग्रामीण भागातील पालक स्मार्टफोन कुठून आणणार? :- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची घेण्यात येणारी कलचाचणी म्हणजे केवळ औपचारिकता राहिली आहे. कलचाचणी घेण्यासाठी शाळांमधील अपुरी आवश्यक यंत्रणा, संगणक, इंटरनेट, मोबाईल अ‍ॅपच्या तांत्रिक  अडचणी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक, स्मार्टफोन वापरताना होणारा त्रास बघितला तर या परीक्षेच्या अंतस्थ हेतूलाच हरताळ फासण्याचे उद्योग सुरू असल्याचे स्पष्ट होते.

इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या मुलांचा पुढील शिक्षणाचा कल जाणून घेण्यासाठी हा उपक्रम आहे. याअंतर्गत राज्यभरातून दरवर्षी शहरी आणि ग्रामीण भागातील १२ लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात. कृषी, क ला व मानव्यविद्या, वाणिज्य, ललित क ला, आरोग्य व जैविक विज्ञान, तांत्रिक  आणि गणवेशधारी सेवा या सात क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे क ल जाणून घेण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते.

यंदा २७ डिसेंबर ते १८ जानेवारी २०२० या कोलावधीमध्ये ती घेण्यात येणार आहे. मागील वर्षांपासून ही परीक्षा ऑनलाईन घेतली जात असून यासाठी संगणक किंवा मोबाईल ‘अ‍ॅप’चाही पर्याय उपलब्ध क रून देण्यात आला आहे. मात्र, परीक्षा घेताना ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागातील सुविधांच्या तफावतीचा कुठलाही विचार झालेला नाही. इयत्ता दहावीमध्ये एका शाळेत किमान शंभर ते दोनशे विद्यार्थी असतात. अशावेळी एवढय़ा मोठय़ा संख्येने विद्यार्थ्यांसाठी संगणक उपलब्ध होणे शक्यच नाही.  किंबहुना ग्रामीण भागातील शाळांमध्ये संगणकाची सोयच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरून मोबाईल आणण्यास सांगितले जाते.

‘महाकरिअर मित्र’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ही परीक्षा होत आहे. यासाठी शिक्षकांना प्ले स्टोरमधून हे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागते. त्यानंतर या अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी परीक्षा घेतली जाते. मात्र, अ‍ॅपच्या तांत्रिक  अडचणी, शिक्षक  व विद्यार्थ्यांना ते सहज हाताळता येत नसल्याने  कलचाचणी घेताना चांगलीच पंचाईत होते. शहरातील शाळांमध्ये मोबाईलचा सहज वापर करू न शकणारे काही विद्यार्थी इतर मुलांचे पेपर सोडवून देत असल्याची अनेक उदाहरणेही समोर आली आहेत.

ग्रामीण शाळांमध्ये सुविधा नसल्याने अनेक शिक्षक विद्यार्थ्यांना इंटरनेट कॅफेमध्ये नेत असल्याचाही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे  ही परीक्षा आता केवळ नावालाच घेतली जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

अशा आहेत अडचणी

  •  परीक्षेसाठी शाळांमध्ये आवश्यक यंत्रणा नाही.
  •  ग्रामीण भागात इंटरनेटच्या अपुऱ्या सुविधा.
  •  मुख्य परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या वेळेचा अपव्यय.
  •  विद्यार्थ्यांचा कल असला तरी घरी पोषक वातावरण नाही.
  •  विद्यार्थ्यांना घरून आणावा लागतो मोबाईल.
  •  अध्यापनाचा मोठा वेळ वाया.

कलचाचणीचा विद्यार्थ्यांना काहीही उपयोग नाही. अपुऱ्या सुविधा असताना परीक्षा घ्यायची कशी, हा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे शासनाने कलचाचणी बंद करावी आणि शिक्षकांचा अध्यापनाचा वेळ यामध्ये वाया घालवू नये. – अनिल शिवणकर,  विदर्भ सहसंयोजक,  भाजप शिक्षक आघाडी.