‘एनटीए’ने परीक्षेत पारदर्शकता आणण्याची मागणी

नागपूर : ‘नीट’ परीक्षेमध्ये डमी विद्यार्थी  बसवल्याचे उघड होताच पालक व विद्यार्थ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अशा भ्रष्ट प्रकारांमुळे होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून परीक्षा घेणाऱ्या राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) यासंदर्भात कठोर पावले उचलून परीक्षेत पारदर्शकता आणावी, अशी मागणी केली जात आहे.

आयआयटी आणि वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी दरवर्षी देशभरातून २४ लाख विद्यार्थी ‘जेईई’ आणि ‘नीट’ परीक्षेला सामोरे जातात. मात्र, यातून केवळ दीड लाख विद्यार्थीच आयआयटी, एनआयटी आणि वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवू शकतात. यामुळे शिकवणी वर्ग चालवणाऱ्यांचे एक मोठे आणि महागडे जाळे निर्माण झाले आहे.

वैद्यकीय शिक्षणापेक्षा शिकवणी वर्गात प्रवेश मिळवणे हे पालकांसाठी अधिक खर्चिक बाब झाली आहे. शिवाय वैद्यकीय प्रवेशासाठी मोठी स्पर्धा राहत असल्याने  शिकवणी वर्गानीही गैरप्रकार करायला सुरुवात केली आहे. ५० लाखांहून अधिक  खर्चू शकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जागेवर डमी विद्यार्थी बसवून परीक्षा उत्तीर्ण करण्याची हमी देण्याचा व्यवसाय काही शिकवणी वर्गानी थाटला आहे. त्यामुळे  पालकांमध्ये  संतापाची लाट उसळली आहे.

लाखो रुपये खर्चून आणि दोन ते तीन वर्षे कठोर मेहनत करून विद्यार्थी ‘नीट’ची परीक्षा देतात. मात्र, अशा गैरमार्गाने ‘नीट’चे प्रवेश होत असतील तर आता विश्वास तरी कशावर ठेवावा, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

काय म्हणतात, पालक-विद्यार्थी?

‘नीट’ परीक्षेत घडलेला गैरप्रकार  फारच गंभीर आहे. यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. श्रीमंतांची मुले या जागा बळकावत असले तरी भविष्यात ते वैद्यकीय शिक्षणात टिकत नाही. मधातून शिक्षण सोडतात. यामुळे अन्य होतकरू विद्यार्थ्यांचे नुकसान होते. परीक्षेत अनेक बदल करण्याची गरज आहे.

– पाणिनी तेलंग, नीट, जेईई परीक्षा तज्ज्ञ.

केंद्र सरकारच्या नामवंत अशा ‘एनटीए’ संस्थेकडून ‘नीट’ची परीक्षा घेतली जात असतानाही असा गैरप्रकार होणे हे दुर्दैव आहे. माझी मुलगी मागील दोन वर्षांपासून ‘नीट’ची तयारी करते. मात्र, अशाप्रकारे बनावट विद्यार्थी बसवून श्रीमंतांच्या मुलांना उत्तीर्ण केले जात असल्याचे ऐकून तिलाही धक्का बसला आहे.

– विकास भालाधरे, पालक.

मुलगा हुशार असल्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती नसतानाही ‘नीट’च्या तयारीसाठी आम्ही लाखो रुपये खर्च करून शिकवणी लावून दिली. मात्र, पैसे देऊनच अशा गैरमार्गाने विद्यार्थी उत्तीर्ण होत असतील तर आमच्यासारख्या सामान्यांच्या मुलांनी काय करावे? असा गैरप्रकार करणाऱ्यांवर शासनाने कठोर कारवाई करावी.

– मनीष जांभोळे, पालक.

माझे लहानपणापासून डॉक्टर होण्याचे स्वप्न आहे. माझे आई-वडीलही सगळ्यांना फार अभिमानाने मी डॉक्टर होण्यासाठी तयारी करतो, असे सांगतात. मात्र, असे गैरप्रकार करून आमच्या हक्काच्या जागा बळकावल्या जात असतील तर परीक्षा घेणाऱ्या संस्थेची कार्यशैलीच बदलली पाहिजे.

– हर्षदा लोहकरे, विद्यार्थिनी

परीक्षा म्हटली की गैरप्रकार होतात हे माहिती आहे. मात्र, ‘नीट’ काही साधीसुधी परीक्षा नाही. त्यातही एनटीएसारखी संस्था ही परीक्षा घेत असताना असे प्रकार घडणे चुकीचे आहे. परीक्षेत पारदर्शकता यायला हवी.

– रोहित काळे, विद्यार्थी.