हॉटेल संचालकाची मनमानी, नासुप्र प्रशासन हतबल

नागपूर : सीताबर्डीतील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासकडून सीताबर्डी परिसरात ‘पार्किंग प्लाझा’ निर्माण करण्यात आला. पण, तो गेल्या काही वर्षांपासून बंद असल्याने पांढरा हत्ती ठरला आहे. तेथील हॉटेल संचालकाच्या मनमानीमुळे कोणत्याही वाहनाला प्रवेश देण्यात येत नसल्याची तक्रार वारंवार केली जाते. तरीही नासुप्रकडून हॉटेल संचालकांवर कारवाई होत नसून सीताबर्डीतील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्याऐवजी अधिकच गंभीर होत आहे.

सीताबर्डीतील वाहतूक समस्या सोडवण्याबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक जनहित याचिका दाखल आहे. या याचिकेवर न्यायालयाने मुख्य सचिवांच्या अखत्यारित एक समितीही स्थापन केली आहे. सहा वर्षांपूर्वी नासुप्रने सीताबर्डीमध्ये बहुमजली पार्किंग प्लाझा तयार करण्याचा निर्णय घेतला. त्या अंतर्गत बांधा, वापरा व हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर हा पार्किंग प्लाझा बांधण्याचा करार  एका कंपनीशी केला. या कंपनीला काही जागा खासगी व्यवसायासाठी भाडेतत्त्वावर देण्यात आली. त्या ठिकाणी संबंधित कंपनीने पार्किंग प्लाझा व हॉटेल बांधले. दोघांचेही प्रवेशद्वार एकच आहे. पार्किंग प्लाझा बांधल्यानंतर संबंधित कंपनीला दोन वर्षे हे चालवण्याचे अधिकार दिले होते. त्यानंतर त्यावर संपूर्णपणे नासुप्रची मालकी असणार होती.

पण, कंपनीने हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांनाच त्या ठिकाणी वाहन ठेवण्याची मुभा दिली. इतर वाहनचालकांना प्रवेश नाकारला. यावरून वाहन ठेवणारे व हॉटेल व्यवस्थापनामध्ये अनेकदा वादावादी झाली. त्याच्या तक्रारीही नासुप्रकडे झाल्या. पण, अधिकाऱ्यांकडून संबंधित हॉटेल व्यवस्थापनाविरुद्ध कोणतीच कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाहतूक कोंडी व वाहनतळाची समस्या सोडवण्यासाठी बांधलेला पार्किंग प्लाझा स्वत:च एक समस्या म्हणून उभा ठाकला असून गेल्या चार वर्षांपासून तो बंद  आहे.

पार्किंग प्लाझाचा ताबा नासुप्रने घेतला आहे. त्यासाठी तीनवेळा निविदा मागवण्यात आल्या होत्या. पण, कुणीच निविदा भरत नव्हते. आता पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करून निविदा मागवण्यात आल्यात. आलेल्या निविदांवर लवकरच अंतिम निर्णय घेऊन पार्किंग प्लाझाच्या ठिकाणी वाहने उभी करण्यासाठी करार करण्यात येईल. हॉटेल संचालकाचा आता पार्किंग प्लाझाशी कोणताही संबंध नाही. प्रवेशद्वार एकच असले तरी भविष्यात अडचण येणार नाही.

– सुनील गुज्जेलवार, अधीक्षक अभियंता, नासुप्र