03 June 2020

News Flash

नोंदणी नसतानाही प्रवास करता येण्याची अफवा

शेकडो प्रवाशांची रेल्वेस्थानकावर गर्दी

शेकडो प्रवाशांची रेल्वेस्थानकावर गर्दी

नागपूर : रेल्वे तिकीट ‘कन्फर्म’ असल्याशिवाय रेल्वेस्थानकाच्या आजूबाजूला कुणालाही फिरकू न देणाऱ्या सुरक्षा यंत्रणेच्या डोळ्यासमोर सुमारे दोन ते अडीचशे नागरिक रेल्वेस्थानकाजवळ पोहचले. त्यामुळे नागपूर रेल्वेस्थानकासमोरील उड्डाण पुलासमोर आज बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास एकच गोंधळ उडाला.

बुधवारी नागपुरातून बिहार, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशकडे जाणारी श्रमिक विशेष गाडी सोडण्यात आली. या गाडीसाठी सुमारे ४ हजार १९८ नागरिकांनी प्रशासनाकडे नोंदणी केली होती.  विदर्भात अडकून पडलेल्यांना कामगार, विद्यार्थी, पयर्टक आणि इतर नागरिकांना हावडा, कटीहार (बिहार) आणि उत्तर प्रदेशातील त्यांच्या स्वगावी सोडण्याकरिता तीन विशेष गाडय़ा सोडण्यात आल्या. या गाडय़ा सुटणार असल्याची माहिती संबंधित नागरिकांना लघुसंदेशाद्वारे देण्यात आली होती. परंतु नोंदणी झाली नसेल तरी प्रवास करता येईल, अशी अफवा पसरवण्यात आल्याने  शेकडो महिला, पुरुष स्थानकासमोरील उड्डाण पुलाखाली जमले.

ही गर्दी वाढतच चालल्याने अखेर पोलिसांनी त्यांना तेथून हुसकावून लावले. खुद्द अतिरिक्त पोलीस आयुक्त येथे पोहचले आणि आपापल्या परिसरातील पोलीस ठाण्यात नोंदणी करा, तुम्हाला मोफत नागपूर रेल्वेस्थानकावर बसने आणले जाईल, असे नागरिकांना सांगितले. परंतु हे नागरिक काही अंतरावर जाऊन थांबले. त्यांना जाण्यासाठी कोणतेही साधन नव्हते. पण, जमावबंदी असताना आणि पोलीस बंदोबस्त सर्वत्र असताना इतकी मोठी गर्दी  स्थानकावर जमलीच कशी, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. बिहाराल रेल्वेगाडी जात असल्याची अफवा पसरवण्यात आली. त्यामुळे हे नागरिक येथे पोहचले, असे येथील एका नागरिकाचे म्हणणे होते.

‘‘प्रवास नोंदणी नसतानाही आपल्याला जाता येईल, असे समजून काही नागरिक रेल्वेस्थानक परिसरात आले होते. त्यांना घरी पाठवण्यात आले. ’’

– नीलेश भरणे, अतिरिक्त पोलीस आयुक्त.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2020 1:54 am

Web Title: passengers crowds at nagpur railway station over rumours about registration zws 70
Next Stories
1 आयुर्वेद महाविद्यालयाचा अधिकारी लाच घेताना जेरबंद
2 लोकजागर : ‘आदरणीयांचे’ अवमूल्यन?
3 शिकवलेल्या अभ्यासक्रमाचे तपशील तरी तात्काळ सादर करा!
Just Now!
X