रेल्वेने ऑनलाइन तिकीट विक्रीला प्राधान्य दिले असले तरी या पद्धतीने तिकीट बुकिंग करताना उद्भवणाऱ्या विविध अडचणी तातडीने सोडवण्यासाठी सक्षम यंत्रणा नसल्याने प्रवाशांना अनेकदा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनतर्फे (आयआरसीटीसी) रेल्वेची ऑनलाईन तिकीट विक्री केली जाते. याशिवाय खानपान, तिकीट रद्द केल्यास परतावा देणे, हॉटेल, एक्झेकेटिव्ह लॉऊन्झ सेवा दिल्या जातात. तिकीट घेताना समस्या, जेवण निकृष्ट दर्जाचे असणे, तिकीट रद्द केल्यावर परतावा वेळेत न मिळणे आदी प्रवाशांच्या तक्रारी आहेत. तिकीटसाठी बँक खात्यातून पैसे वळते केले जातात, पण अनेक वेळा तिकीट बुकिंग होत नाही. ही रक्कम तीन ते चार दिवसांनी परत मिळते. प्रवाशाकडे नेटके पैसे असल्यास तिकीट बुकिंग करण्यासाठी तेवढे दिवस प्रतीक्षा करावी लागते. म्हणजे त्या प्रवाशांचे नियोजन बिघडते. याबद्दलची तक्रार करण्याची सोय नाही आणि ताबडतोब रक्कम मिळण्याचीही सोय नाही. ऑनलाइन बुकिंग झाले, ग्राहकाच्या खात्यातून रक्कमही कापली गेली, परंतु काही वेळाने रक्कम प्रवाशाच्या खात्यात परत आली. त्यामुळे तिकीट रद्द तर झाली नाही ना, अशी शंका निर्माण होते. यासंदर्भात संकेतस्थळावर तक्रार करण्यात आली असता प्रवाशाला नव्याने तिकीट घेण्यास सांगण्यात आले. रेल्वेगाडीत चढल्यावर टीटीईकडून कळले की दोन तिकीट बुक झाले आहे. ऑनलाइन बुकिंगसंदर्भात यासारख्या अनेक तक्रारी आहेत, परंतु आयआरसीटीसीकडून त्याचे योग्य प्रकारे आणि तातडीने निराकरण केले जात नाही.

रेल्वे आणि आयआरसीटीसी

रेल्वेत सेवा देणाऱ्या रेल्वे आणि आयआरसीटीसी या दोन एजन्सी आहेत. रेल्वे प्रवाशांना तिकीट बुकिंग, जेवण, पाणी, बेडरोल आदी कुठलीही समस्या असल्यास ती तातडीने सोडवली जावी. ही साधी अपेक्षा असते, परंतु रेल्वे सेवांची विभागणी या दोन एजन्सीमध्ये झाली आहे. आयआरसीटीसीशी सामान्य प्रवाशांचा थेट संबंध नसतो. त्यामुळे प्रवासादरम्यान कुठल्याही अडचणी आल्यास रेल्वेला जबाबदार धरले जाणे साहजिकच आहे.

हेल्पलाइनवर असमाधान

तिकीट संदर्भातील सर्व प्रकारच्या चौकशीसाठी आयआरसीटीने ‘१३९’ ही हेल्पलाइन दिली आहे, परंतु यावर बऱ्याचदा ताटकळत राहावे लागते, अशी प्रवाशांची तक्रार आहे. इंटरनेट तिकीट संदर्भात काही तक्रारी असल्यास ‘केअर अ‍ॅट आयआरसीटीसी डॉट को डॉट इन’ या संकेतस्थळावर तक्रार करावी लागते. यावर प्रवाशांचे समाधान होत नाही. तसेच अनेकांना त्याविषयीची माहिती नसल्याने प्रवासी रेल्वेस्थानकावर किंवा रेल्वेच्या जवळच्या रेल्वे कार्यालयात तक्रार घेऊन जातात. रेल्वेचे अधिकारी ई-तिकीटच्या विषयाशी संबंध नसल्याचे सांगतात आणि संकेतस्थळ किंवा हेल्पलाईनवर संपर्क साधण्याची सूचना करतात. यामुळे प्रवाशाचे समाधान मात्र होत नाही.