सहा महिन्यांत उभारणीची घोषणा फोल; ‘एमएडीसी’सोबत अद्याप करार नाही

मिहानमधील योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली उद्योग समूहाच्या फूड पार्कमधून सहा महिन्यांत उत्पादनाला सुरुवात होईल, अशी घोषणा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र, पाच महिन्यानंतरही महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी)आणि पतंजली समूह यांच्यात करारच झाला नसल्याचे उघड झाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे रामदेव बाबा हे त्यांच्या हरिद्वार येथील अन्न प्रक्रिया उद्योगाच्या धर्तीवर नागपुरात उद्योग सुरू करण्यास तयार झाले. ‘एमएडीसी’ने तीन महिन्यांत जमीन हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण केली. मिहानमधील लाख मोलाची जमीन रामदेव बाबांना कवडीच्या भावात दिल्याची टीका झाली. या पाश्र्वभूमीवर मिहानमध्ये १० सप्टेंबर २०१६ ला पंतजली फूड पार्कचे भूमिपूजन झाले. मुख्यमंत्र्यांनी सहा महिन्यांत फूड पार्क सुरू होईल आणि पाच हजार युवकांना रोजगार मिळणार असल्याचे घोषित केले. त्यांच्या या घोषणेला जवळपास पाच महिने झाले आहेत. एमएडीसी आणि पतंजली समूह यांच्यात अजून करारच झाला नसल्याची माहिती आहे. मिहानमधील सेझ किंवा नॉन-सेझमध्ये उद्योगधंदा सुरू करण्यासाठी जमिनीची रक्कम भरल्यानंतर करार केला जातो. त्यानंतर पर्यावरणीय मंजुरी तसेच इतर परवानगी मिळाल्यावर उद्योग उभारणीस सुरुवात केली जाईल. या प्रक्रियेसाठी काही महिने लागतील. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे सहा महिन्यांत उत्पादन सुरू होणे शक्य नाही.

पतंजली समूहाकडून सेझमधील जमिनीचे ६४ कोटी रुपये आलेले नाही आणि त्यामुळे करारही झालेला नाही. या समूहाने सेझमध्ये ६० एकर जमीन घेतली आहे. एमएडीसीने मिहानमध्ये फूड पार्क उभारण्यासाठी जमीन देताना तीन प्रमुख अटी घातल्या आहेत. यामध्ये उद्योग सुरू करणाऱ्या कंपनीला दरवर्षी दोन हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. विदर्भातून किमान १०० कोटी रुपयांचा कृषीमाल खरेदी करावा लागेल आणि एक वर्षांत उत्पादन सुरू करावे लागणार आहे. परंतु भूमिपूजन होऊन सुमारे पाच महिने झाले तरी उद्योग उभारणी झालेली नाही.

पाचशे एकर जमीन आरक्षित

राज्य सरकारने विशेष बाब म्हणून मिहानमधील ५०० एकर जमीन कृषी मालावर आधारित उद्योगांसाठी आरक्षित केली. तसेच येथील जमिनीची किंमत प्रती एकर २५ लाख रुपये निश्चित केली. रामदेव बाबा यांना २३० एकर जमीन देण्यात आली. मिहानमध्ये जमिनीची किंमत सुमारे ७५ लाख ते एक कोटी रुपये प्रती एकर असताना रामदेव बाबा यांना २५ लाख रुपये प्रती एकर देण्यात आल्यावर टीका झाली होती.

कार्यवाही लवकरच

‘पंतजली समूहाने विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) आणि सेझबाहेर जमीन घेतली आहे. सेझबाहेरील जमिनीची रक्कम प्राप्त झाली आहे. सेझमधील जमिनीचे ६४ कोटी रुपये रक्कम येणे बाकी आहेत. रक्कम प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आणि पतंजली समूह यांच्या करार होईल. ही कार्यवाही लवकरच होणे अपेक्षित आहे.’

– अतुल ठाकरे, विपणन व्यवस्थापक, एमएडीसी.