News Flash

पतंजलीचे प्रस्तावित ‘फूड पार्क’ अडचणीत?

उद्योग सुरू न केल्याने भूखंडावरील मालकी हक्क सोडण्याची नोटीस

(संग्रहित छायाचित्र)

येथील मिहान नॉन-सेझमध्ये २३० एकरचा भूखंड घेऊन वेळेत उद्योग सुरू न केल्याने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने या भूखंडावरील मालकी हक्क सोडा, अशी नोटीस रामदेवबाबांच्या ‘पतंजली फूड अँड हर्बल पार्क’ या कंपनीला बजावली आहे.

रामदेवबाबा यांच्या पंतजली समूहाने विदर्भातील संत्री उत्पादक आणि इतर शेतकऱ्यांना लाभ होईल, असे सांगत मिहान-नॉन सेझमध्ये सप्टेंबर २०१६ ला जमीन घेतली. सहा महिन्यांत उद्योग सुरू करण्याची घोषणा करीत या उद्योगातून विदर्भातील दहा हजार युवकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळेल, असा दावाही केला. परंतु आजपर्यंत येथे गोदाम बांधणे आणि सयंत्र स्थापित करण्याचे काम पूर्ण झाले नाही. सध्या ती कामेदेखील थांबवण्यात आली आहेत. यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना मिळालेल्या तपशिलानुसार पतंजली समूहाला भूखंडावरील मालकी हक्क सोडण्यास नोटीस बजावण्यात आली आहे.

एल अँड टीकडून भूखंड परत

मिहान-सेझमध्ये ७७ व नॉन-सेझमध्ये ४२ कंपन्यांना/ उद्योगांना भूखंड देण्यात आले आहेत. एमएडीसीला भूखंड विक्रीतून आजपर्यंत मिहान-सेझमध्ये  ५०८.४७ कोटी व नॉन सेझमध्ये अंदाजे ४१६.७१ कोटी एवढी रक्कम मिळाली आहे. मिहान सेझमध्ये १७ कंपन्यांनी पूर्ण रक्कम दिली नाही, यामध्ये अंदाजे ३३.५६ कोटी अजूनही येणे बाकी आहेत. मिहान-सेझमध्ये भूखंड घेऊन उद्योग उभारण्यात अपयशी ठरलेल्या मे. एल. अँड टी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स लिमिटेड यांनी भूखंड परत के ला आहे.

प्रकरण काय?

* पतंजली समूहाने सेझमध्ये सात एकर जमीन घेतली आहे. त्या माध्यमातून कंपनीचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश करण्याचा प्रयत्न आहे. पतंजली फूडपार्कचे सुमारे ९० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे.

* या प्रकल्पात पतंजली उद्योग समूहाने ५०० कोटींची गुंतवणूक करून, पायाभूत सुविधा उभारली आहे. या प्रकल्पाच्या प्रक्रियेसाठी सयंत्रे आयात केलेली आहेत.

* मात्र, या समूहासमोर खेळत्या भांडवलाची समस्या आहे. हे भांडवल उभारण्याचे कार्य शेवटच्या टप्प्यात असल्याचे सांगितले जात असतानाच सेझ आणि नॉनसेझमधील पतंजली समूहासह १५ उद्योगांना मालकी हक्क सोडण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2021 12:16 am

Web Title: patanjali proposed food park in trouble abn 97
Next Stories
1 राज्यातील नव्या वसतिगृहांना ‘मातोश्री’ नाव देणार!
2 भाजपचे वीज दरवाढीविरुद्धचे आंदोलन फसवे -नितीन राऊत
3 संघर्षमय प्रवास..
Just Now!
X