नागपूर : मानकापूर येथील एलेक्सिस रुग्णालयातील सीटी स्कॅन विभागातील हाऊस किपिंग कर्मचाऱ्याने रुग्णालयात आलेल्या एका ३९ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार आहे. मानकापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

बबिता (बदललेले नाव) असे रुग्णाचे नाव आहे. तर महेश घोडमारे (३९) असे आरोपीचे नाव आहे. बबिता यांना भोवळ येण्यासह इतर त्रास होता. त्या उपचारासाठी १९ जूनला सायंकाळी पाचच्या सुमारास एलेक्सिस रुग्णालयात आल्या.  एक महिला कर्मचारी त्यांना स्ट्रेचरवर सीटी स्कॅन विभागात घेऊन गेली. तेथे स्ट्रेचरवरून हलवण्यासाठी हाऊस किपिंगचा कर्मचारी असलेल्या महेशने मदत करताना तिच्यासोबत गैरवर्तन केल्याची रुग्णाची तक्रार आहे. महिलेने इतरांना हा प्रकार सांगितल्याने  खळबळ उडाली. दरम्यान, महिलेने मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून महेशच्या विरोधात कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. त्याला न्यायालयातही हजर करण्यात आले. याबाबत एलेक्सिस रुग्णालयातील निरंजन जोशी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी रुग्णाला गैरसमज होण्याची शंका व्यक्त केली. यावेळी येथे परिचारिकांसह स्ट्रेचरवर नेणारी महिला कर्मचारी हजर होती. महिलेच्या तक्रारीनंतर रुग्णालयानेच पुढाकार घेत पोलिसांना सूचना दिली. आता पोलिसांच्या तपासात वास्तव पुढे येण्यास मदत होणार असल्याचेही ते म्हणाले.