नागपूर : बाधित वाढत असलेल्या शहरात रात्रीच्या संचारबंदीचा विचार केला जात असून त्याबाबत राज्य सरकारकडून लवकरच निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी नागपुरात दिली.
विशेषत: औरंगाबाद पुणे, अमरावती, अकोला वर्धा, यवतमाळ आणि नागपूर शहरात रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे यातील काही शहरांमध्ये संध्याकाळी सहा ते पहाटेपर्यंत संचारबंदी लावण्याचा विचार सुरू असून त्या त्या जिल्ह्यतील परिस्थितीनुसार तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबत निर्णय घ्यावे, असे निर्देश सरकारने दिले आहेत. मात्र, त्यानंतरही सुरक्षेच्या दृष्टीने लोकांनी काळजी घेतली नाही तर संचारबंदी लावण्याची वेळ येऊ शकते. सध्या विरोधक-सत्ताधारी असे सर्वच आंदोलन करीत आहेत. करोनाचा वाढता प्रकोप पाहता सर्वच पक्षांनी आंदोलनापासून दूर राहिले पाहिजे. नेत्यांनीही अशा ठिकाणी जाणे टाळले पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले. अवकाळी पावसामुळे अनेक जिल्ह्यत मोठे नुकसान झाले असून नुकसानीचा आढावा घेतला जात आहे. सर्व माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर ठेवणार आहे. विदर्भ वैधानिक विकास मंडळ अस्तित्वात नसले तरी विदर्भाचे मंत्री असल्याने आम्ही विदर्भाच्या वाटय़ाचा निधी कोणीही पळवणार नाही याबद्दल दक्ष आहोत, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.
परीक्षांसदर्भात बैठक
करोनाच्या वाढत्या संकटामुळे शाळा सुरु ठेवाव्यात की नाही, दहावी — बारावीची परीक्षा ऑनलाईन घ्यावी की ऑफलाईन याबद्दल वेगवेगळे विचार आहेत. त्यावर विचार करून निर्णय घेण्यासाठी पुढील आठवडय़ात बैठक होणार आहे. त्यात चर्चा करून निर्णय घेतला, जाईल अशी माहितीही वडेट्टीवार यांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 21, 2021 12:37 am