‘कोरीयन एअर’कडून डॉ. अभिनव देशपांडे यांचे आभार

१७ डिसेंबरला दक्षिण कोरियाच्या सेउल शहरातून दिल्लीकडे येणाऱ्या विमानात अचानक एका प्रवाशाची प्रकृती खालावली. याबाबतच्या उद्घोषनेनंतर नागपूरकर डॉ. अभिनव देशपांडे मदतीला धावले. आंतराष्ट्रीय कायद्यातील धोके स्वीकारत त्यांनी विमानातच रुग्णावर किरकोळ शस्त्रक्रिया केल्याने त्याला जीवनदान मिळाले. त्यामुळे विमान हाँगकाँगला न उतरवता थेट दिल्लीला  उतरता आले. त्यांच्या या योगदानाची दखल घेत  कोरियन एअर या कंपनीने त्यांचे आभार मानले.

डॉ. अभिनव देशपांडे हे तज्ज्ञ रोबोटिक सर्जन असून उपराजधानीतील नॅशनल कॅन्सर इन्स्टिटय़ूटमध्ये कार्यरत आहेत. दक्षिण कोरियाच्या सेवरन्स हॉस्पिटलद्वारे १३ ते १४ डिसेंबरदरम्यान आयोजित   इंटरनॅशनल रोबोटिक्स सर्जन्स लाईव्ह या परिषदेसाठी ते दक्षिण कोरियाला गेले होते. कोरियन एअर कंपनीच्या विमानातून ते परतीच्या प्रवासाला निघाले. तासाभराने  कोरियन नागरिक असलेल्या प्रवाशाची प्रकृती अचानक खालावली. तो वेदनेने विव्हळत होता. रुग्ण आरडाओरड करत असल्याने विमानातील कर्मचारी घाबरले. आपत्कालीन लँडिंगची मागणी पुढे आली. दरम्यान, कर्मचाऱ्यांकडून विमानात कुणी डॉक्टर आहेत काय, अशी विचारणा झाली. डॉ. अभिनव मदतीला धावले. त्यांनी रुग्णाची तपासणी केली असता  त्याला आतळीचा कर्करोग असल्याचे समजले. दरम्यान, हाँगकाँगला आपत्कालीन स्थितीत विमान उतरवण्याबाबत घोषणा झाली. परंतु डॉ. अभिनव यांनी विमानात किरकोळ शस्त्रक्रिया करण्याची तयारी दर्शवली. रुग्णाने होकार दर्शवताच प्रक्रिया सुरू झाली. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, विमानात डॉक्टरांची संपूर्ण माहिती, रुग्णाची स्वाक्षरीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.  रक्तस्रावाचा धोका  टाळून रुग्णाला जीवनदान मिळाले. रुग्ण स्थिर झाल्यावर हे विमान हाँगकाँगला न उतरवता दिल्लीतच उतरवले गेले. विमानातील इतर प्रवाशांनी दिल्लीत डॉ. अभिनव देशपांडेचे अभिनंदन केले. कोरियन एअर या विमान कंपनीनेही  नुकतेच ईमेलद्वारे त्यांचे आभार मानले. डॉ. अभिनव हे सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. वाय.एस. देशपांडे यांचे पुत्र आहेत.