महात्मा फुले जन आरोग्य योजना;निदान तपासणी शुल्काचा परतावा नाही;रुग्णालय प्रशासनाने आरोप फेटाळले

नागपूर : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्वाधिक रुग्णांवर मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालिटी, डागा या शासकीय रुग्णालयांत उपचार होतात, परंतु येथे अनेक रुग्णांना आजाराच्या निदानापूर्वी लागणाऱ्या तपासणी शुल्काचा परतावा मिळत नाही, अशा नातेवाईकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे याला जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, सर्व संबंधित रुग्णालय प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहेत.

शहरात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत चार शासकीय रुग्णालये नोंदणीकृत आहेत. त्यापैकी मेडिकलला सर्वाधिक शस्त्रक्रिया होतात. येथे रुग्ण आल्यावर त्यालाा विविध तपासण्या कराव्या लागतात. मेडिकलमध्ये होणाऱ्या तपासण्यासाठी दारिद्रय़रेषेखालील रुग्णांकडून शुल्क घेतले जात नाही, परंतु इतर रुग्णांना शुल्क द्यावे लागते. मेडिकलमध्ये काही तपासण्या होत नाही. त्या बाहेरून कराव्या लागतात. तपासणीत एखाद्या आजाराचे निदान झाल्यास व त्याचा समावेश महात्मा फुले योजनेत झाल्यास या रुग्णाची नोंदणी होते. पुढे रुग्णाने या तपासणीच्या शुल्काचा दावा केल्यास ते पैसे रुग्णालयाला परत करावे लागतात. मात्र, डॉक्टर याबाबत रुग्णांना सांगत नाही.

सुपरस्पेशालिटी रुग्णालयांतही एन्जिओग्राफी तपासणीसाठी चार हजार रुपये आकारले जाते. शुल्क परत गेले जात नसल्याच्या तक्रारी आरोग्य योजनेच्या कार्यालयांमध्ये आल्या आहेत.

मेयोत डायलेसिसचा घोळ

मेयोतील डायलेसिस केंद्राची जबाबदारी एका खासगी संस्थेला पीपीपी तत्त्वावर दिली आहे, परंतु कधी पाण्याचा अभाव, कधी उपकरण बंद तर कधी विजेच्या प्रश्नाने वारंवार या केंद्रातील डायलेसिसची सुविधा बंद पडते. हे केंद्र सुरू होण्यापूर्वीही वादात अडकले होते. मेयो प्रशासनानेही या केंद्राकडून कराराचे उल्लंघन होत असल्याने करार रद्द करण्याचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण खात्याला पाठवला होता. त्यावर पुढे काहीही झाले नाही.

‘सुपर’ला शस्त्रक्रिया परवडत नाही

सावंगीतील दत्ता मेघे रुग्णालयासह शहरातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये हृदयाच्या गंभीर शस्त्रक्रिया महात्मा फुले योजनेअंतर्गत यशस्वी होत आहेत, परंतु मेडिकलच्या अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी सुपरस्पेशालिटी रुग्णालयाला या योजनेमुळे आर्थिक फटका बसल्याचे सांगत सध्याच्या पॅकेजमध्ये बायपास, वॉल रिप्लेसमेंट सारख्या शस्त्रक्रिया अशक्य असल्याचे पत्र महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे.  दरम्यान, सुपरमध्ये झालेल्या शस्त्रक्रियेचे दोन कोटीं रुपयांचे दावे विमा कंपनीकडे सादरच केले नाही, अशी माहिती आहे.