स्वाईन फ्लू :  कोणता अहवाल खरा  मानायचा? नातेवाईकांना प्रश्न

नागपूर : उपराजधानीतील खासगी रुग्णालयातील  रुग्णांचा ‘स्वाईन फ्लू’ तपासणी अहवाल खासगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आला. हा  रुग्ण मेडिकलमध्ये दाखल झाल्यावर शासकीय प्रयोगशाळेत तपासणी केली  असता अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे कोणत्या प्रयोगशाळेचा अहवाल खरा? असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्य़ात स्वाईन फ्लूचे रुग्ण आणि त्यामुळे होणारे मृत्यू वाढले आहेत. आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार नागपूर विभागात या आजाराच्या रुग्ण संख्येने त्रिशतक ओलांडले आहे. येथे आजपर्यंत ३०८ रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान २३ जण दगावले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे नागपूर शहरातील आहेत. नागपूरच्या खासगी रुग्णालयांत उपचारादरम्यान आराम न पडल्यास मेडिकल, किंवा मेयोला हलवतात. या रुग्णांचा शासकीय रुग्णालयांतील डॉक्टरांकडून पुन्हा स्वाईन फ्लू तपासणी केली जाते. सध्या मेडिकल आणि मेयोतील तपासणी मेयोच्या प्रयोगशाळेत होते.नुकतेच मेडिकलच्या चार रुग्णांचे खासगी प्रयोगशाळेतील स्वाईन फ्लू अहवाल पॉझिटिव्ह असताना मेयोच्या प्रयोगशाळेच्या तपासणीत ते निगेटिव्ह आले. त्यामुळे दोन्ही प्रयोगशाळेपैकी खरा अहवाल कुणाचा? हा प्रश्न नातेवाईकांना भेडसावत आहे.

रुग्णालयनिहाय दगावलेले रुग्ण

रुग्णालय                    मृत्यू  संख्या

न्यू ईरा                           ०४

दुर्गा                                ०१

आदित्य                           ०३

व्हिम्स                             ०२

व्हिनस                            ०२

जय देशमुख                     ०१

रुग्णालय              मृत्यू  संख्या

ऑरेंज सिटी                   ०२

अ‍ॅलेक्सिस                      ०२

क्रिटीकेअर                      ०१

वोक्हार्ट                           ०१

इतर रुग्णालय                ०२

एकूण                              २३