एसटी कर्मचाऱ्यांना २५ टक्के वेतनवाढीच्या मुद्यावर महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेसच्यावतीने (इंटक) १७ डिसेंबरपासून राज्यव्यापी संप पुकारण्यात आला होता. शुक्रवारी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत संघटनेची बैठक झाली. त्यात या वेतनवाढीकरिता सकारात्मक भूमिका परिवहनमंत्र्यांनी घेतली. त्यामुळे इंटकने दुपारपासून संप मागे घेऊन काम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती विधानभवन परिसरात इंटकचे अध्यक्ष व माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी दिली.
मागण्यांबाबत चर्चेकरिता रावते यांनी शुक्रवारी बैठक घेतली. त्यात एसटीच्या कर्मचाऱ्यांना २५ टक्के वेतनवाढ देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली. हे वेतन १ जानेवारी २०१६ पासून कर्मचाऱ्यांना देण्याकरिता इंटकने आग्रह धरला आहे. सोबत बैठकीत ‘एसटी’च्या मान्यताप्राप्त संघटनेने केलेला जुना करार ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत रद्द करण्यासह एसटी महामंडळात एकच मान्यताप्राप्त संघटनेबाबतच्या कायद्यात दुरुस्ती करून इतरही संघटनांना त्यात प्रवेश देणे याबाबत आग्रह धरला.