शेंगदाण्याला हिरवा रंग देऊन बाजारात पिस्ता म्हणून विक्री करणाऱ्याच्या कारखान्यावर छापा टाकून गुन्हे शाखा पोलिसांनी एकाला अटक केली. नरेश दशरथ बोकडे (४५) रा. गोळीबार चौक, जागनाथ बुधवारी असे आरोपीचे नाव आहे.

उपराजधानीतील पाचपावली, तांडापेठ परिसरात मोठय़ा प्रमाणात सोनपापडीचे कारखाने आहेत. देशभरात नागपूरच्या सोनपापडीला मागणी आहे. या सोनपापडीत पिस्ता वापरण्यात येतो. सोनपापडीच्या कारखान्यांना पिस्ता म्हणून शेंगदाणे विकण्याचा काम आरोपी करायचा.

याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक सी.टी. मस्के, सहाय्यक निरीक्षक पंकज धाडगे, हवालदार अरुण धर्मे, प्रशांत लाडे, रामचंद्र कारेमोरे, अनिल दुबे, श्याम कडू, टप्पूलाल चुटे, अमित पात्रे, परवेज शेख, राजू पोतदार आणि फिरोज खान यांनी सापळा रचून बुधवारी आरोपीच्या कारखान्यावर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी २० पोती साधे शेंगदाणे, शेंगदाण्याला भाजून त्याला हिरवा रंग दिलेले ४ पोती शेंगदाणे, २ ते ३ पोती पिस्ता आणि पिस्त्याप्रमाणे शेंगदाणे कापण्यासाठी वापरण्यात येणारी मशीन असा एकूण १ लाख ३५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पाचपावली परिसरात असे अनेक धंदे सुरू असल्याची माहिती आहे.