• मुख्यमंत्र्यांच्या शहरातील भीषण वास्तव
  • कुठे जमिनीत शिरल्या; तर कुठे कोलमडल्या

शहरात विजेच्या धक्क्यामुळे होणारे मृत्यू वाढत असतानाही एसएनडीएल- महावितरणसह महापालिका व इतरही यंत्रणा झोपेतच आहे. त्याचे उदाहरण द्यायचे झाल्यास शहरातील विविध भागातील उघडय़ावरील वीज वितरण पेटय़ांचे देता येईल. या पेटय़ा कुठे कोलमडण्याच्या स्थितीत तर कोठे जमिनीत शिरल्या आहेत. सिव्हिल लाईन्समधील सचिवालया समोरच काही पेटय़ा चक्क जमिनीत शिरलेल्या असून पावसाळ्यात यातून जाणाऱ्या वीज प्रवाहाशी संपर्क आला तर तेथून जाणाऱ्यांचे प्राण  जाऊ शकतात, अशी स्थिती आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूर जिल्ह्य़ातील वीज यंत्रणा संपूर्ण राज्याकरिता आदर्श असावी अशी, अपेक्षा आहे. परंतु शहराचे चित्र याउलट आहे.

शहरात विजेचा धक्का लागून दगावणाऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पाश्र्वभूमीवर वीज वितरण पेटय़ांच्या अवस्थेची पाहणी केली असता दाहक चित्र पुढे आले.  राज्याचे मुख्यमंत्री व ऊर्जामंत्रीपद प्रथमच नागपूर जिल्ह्य़ात असताना ही स्थिती असून ती दुरुस्त होणार कधी? हा प्रश्न सर्वसामान्य नागपूरकर विचारत आहेत.

क्वेटा कॉलनीत पेटीला दगडांचा आधार

क्वेटा कॉलनी परिसरात एक वीज वितरण रोहित्र दोन महिन्यांपासून पूर्णपणे कोलमडण्याच्या स्थितीत आहे. परंतु एसएनडीएलने दोन दगडांवर त्याला ठेवून एका तारेने बांधले. वादळी पाऊस झाल्यास वा कुणाचा धक्का लागल्यास ही पेटी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वर्दळीच्या ठिकाणी प्राणांकित अपघातही होण्याचा धोका आहे. या पेटीच्या मागे केंद्रीय आरोग्य योजनेचा दवाखाना आहे. तेथे रोज पाचशेहून जास्त निवृत्त कर्मचारी उपचाराकरिता येतात. त्यातच पेटीच्या शेजारी काही फेरीवाल्यांची दुकाने आहेत.

सेमिनरी हिल्स, सिव्हील लाईन्स

सेमिनरी हिल्स परिसरातील जीएसटी कार्यालयाच्या पुढेही एक वितरण रोहित्र वाकायला आले आहे. ते केव्हाही पडण्याचा स्थितीत आहे. तर सदरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानाजवळील चौकातही वीज पेटीतून मोठय़ा प्रमाणावर जिवंत वीज तारा बाहेर आल्या असून त्याचीही दुरुस्ती एसएनडीएल या वीज कंपनीकडून होत नाही. सिव्हील लाईन्सच्या नागपूर मेट्रोच्या कार्यालयाच्या शेजारी वीज वितरण पेटी तुटली असून त्याला दुरुस्त करण्या ऐवजी प्लॅस्टिक गुंडाळण्यात आले आहे. ही बाब नागरिक आणि मोकाट जनावरांच्याही जीवावर बेतणारी आहे. सचिवालयाच्या पुढेही फुटपाथ हटवून गवत व झाडे लावून सौंदर्यीकरण करण्यात आले. त्याकरिता येथे माती टाकण्यात आली. त्यामुळे वीजपेटी मातीखाली दबली. ती वर करण्याकरिता एसएनडीएलला वेळ नसून पावसाळ्यात येथे चिखल साचल्यास व त्याचा वीज प्रवाहाशी संपर्क आल्यास दुर्घटना घडू शकते.

जुडय़ा भावंडाच्या मृत्यूपासून बोध घेतला नाही

सुगतनगर परिसरात काही महिन्यांपूर्वी उच्चदाबाच्या वीज वाहिनीच्या स्पर्शाने जुळ्या भावंडांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये वीज पुरवठादार कंपनी विरोधात रोष निर्माण झाला. त्यानंतरही शहरातील उघडय़ावरील वीज वितरण पेटय़ांची दुरुस्ती केली जात नाही.

कोणीच वाली नाही

क्वेटा कॉलनी परिसरात वीज वितरण पेटी पडण्याची शक्यता बघता दूरध्वनीवर वारंवार एसएनडीएलसह विविध यंत्रणांना सूचना दिली. परंतु कुणीही दुरुस्ती करण्याकरिता पुढाकार घेतला नाही. येथून नागपूर महापालिकेचा लकडगंज झोनही हाकेच्या अंतरावर आहे. येथे रोज या भागातील लोकप्रतिनिधी हजेरी लावतात. परंतु त्यांनाही येथील संभाव्य धोक्याशी देणे-घेणे नाही.

सुबोध चहांदे, नागरिक, नागपूर

‘‘एसएनडीएल नेहमीच ग्राहकांना सुरक्षित वीज पुरवठा करण्याचा प्रयत्न करते. काही ठिकाणी वीज वितरण पेटय़ांमध्ये दोष असल्यास व ग्राहकांच्या तक्रारी आल्यास तातडीने दुरुस्त केल्या जाईल.’’

जनसंपर्क विभाग, एसएनडीएल, नागपूर