राष्ट्रीय महासंमेलनातून सेवानिवृत्ती वेतनधारकांच्या क्षोभाचे प्रगटीकरण

देशभरातील तब्बल ५४ लाख सेवानिवृत्ती वेतनधारकांना गेल्या २२ वर्षांपासून मिळणारे सेवानिवृत्ती वेतन अक्षरश: भीक घातल्यासारखे दिले जात आहे. एक हजार रुपयांपर्यंत मिळणाऱ्या या सेवानिवृत्ती वेतनात त्यांच्या प्राथमिक गरजादेखील पूर्ण होणे शक्य नाही. केंद्र सरकारला वारंवार साकडे घालूनही त्याचा परिणाम होत नसल्याने शनिवारी सेवानिवृत्ती वेतनधारकांचा क्षोभ उसळला. देशातल्या सुमारे १८ राज्यांतील सेवानिवृत्ती वेतनधारक हजारोंच्या संख्येने शहरातील रेशीमबाग मैदानावर एकत्रित आले आणि मागण्यांच्या समर्थनार्थ दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणला.

निवृत्त कर्मचारी ९५ समन्वय राष्ट्रीय समितीच्या गेल्या आठ वषार्ंच्या सतत संघर्षांमुळे प्रकाश जावडेकर यांनी राज्यसभा याचिका समितीत ईपीएस योजनेत मूलभूत सुधारणा करण्यासाठी याचिका दाखल केली आणि केंद्र सरकारने या याचिकेवर सुनावणीकरिता कोशीयारी समितीचे गठन केले. या समितीने जावडेकरांच्या सर्व शिफारशींचे समर्थन करून शासनाकडे कार्यवाहीसाठी नोव्हेंबर २०१२ मध्ये अहवाल सादर केला. तब्बल साडेचार वर्षाँपासून संसदेच्या दोन्ही सभागृहात त्यावर चर्चा झाली नाही. या शिफारशींमध्ये कर्मचारी भविष्य निधीमध्ये सरकारचे अंशदान १.१६ टक्क्यावरून ८.३३ करावे, किमान सेवानिवृत्त वेतन ३ हजार रुपये किंवा त्याहून अधिक द्यावे, विविध सेवानिवृत्ती वेतन योजनेत कर्मचाऱ्यांना सुविधाजनक योजना निवडण्याचा अधिकार असावा, रक्कम काढण्यासारख्या सुविधा त्वरित लागू करावे, ईपीएस सेवानिवृत्त वेतन महागाईसोबत जोडावे, आदी शिफारशी यात होत्या. या सर्व शिफारशी मंजूर कराव्या, असा सूर या महासंमेलनात उमटला.

या महासंमेलनाला खासदार एन.के. प्रेमचंद्रन उपस्थित राहणार होते, पण ते येऊ शकले नाहीत. त्यांनी भ्रमणध्वनीवरून या महासंमेलनाकरिता शुभेच्छा दिल्या. महासंमेलनाचे उद्घाटन महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते होणार होते, पण त्यांनीही पाठ फिरवली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश येंडे, नागपूर जिल्हा समितीचे अध्यक्ष श्याम देशमुख, प्रकाश खोंडे तसेच १८ राज्यांतील संघटनांचे प्रतिनिधी व्यासपीठावर होते.

– देशभरातून लोक येथे आले हा शुभ संकेत आहे. या ठिकाणी संघटित झालेल्या सर्व लोकांनी संघर्ष विसरू नये, असे भारतीय मजदूर संघाचे रमेश पाटील म्हणाले.

– आज आम्ही निवृत्त झालो, उद्या आणखी काही लोक निवृत्त होतील. सेवानिवृत्तीच्या मार्गावर असणाऱ्यांसह तरुणाईने सुद्धा आमच्यासोबत यावे, असे आवाहन निवृत्त कर्मचारी ९५ समन्वय समितीचे नागपूर जिल्हा शाखा अध्यक्ष प्रकाश पाठक यांनी केले.

– राष्ट्रीय नेते या शहरात आहेत आणि सरकारही येथून चालते. त्यामुळे नागपूरातच महासंमेलन घेण्यासंदर्भात आधीच सुचवल्याचे जनमंचचे अ‍ॅड. अनिल किल्लोर म्हणाले.

– संविधानाची गोष्ट करताना त्यात समानतासुद्धा आहे, पण सेवानिवृत्ती वेतनधारकांच्या बाबतीत ही समानता गुंडाळून ठेवलेली दिसते, असे जनमंचचे प्रा. शरद पाटील म्हणाले.