संस्कृत महोत्सवाचे उद्घाटन : राज्यपाल कोश्यारी यांचे विधान

संस्कृत भाषेचा सन्मान करण्याचा हा काळ आहे. मात्र, एका विशिष्ट विचारधारेचे लोक संस्कृत ही मृत भाषा असल्याचे भाष्य करत तिला विरोध करतात, हे दुर्दैवी असल्याची खंत; परंतु संस्कृत ही फिनिक्स पक्ष्यासारखी आहे, हे या विचारधारेच्या लोकांनी ध्यानात ठेवावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोमवारी केले.

‘कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचा विस्तार सेवा मंडळ’ यांच्या वतीने आयोजित केलेल्या संस्कृत महोत्सवाचे राज्यपालांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. या वेळी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल, राज्याचे शिक्षणमंत्री उदय सामंत, कुलगुरू श्रीनिवास वरखेडी, कुलसचिव विजयकुमार उपस्थित होते.

राज्यपाल पुढे म्हणाले की, भारतीय साहित्यात महाकवी कालिदास हे ‘एव्हरेस्ट’ पर्वतासारखे आहेत. संस्कृतचे केवळ भाषाज्ञान असणे पुरेसे नाही, तर या भाषेतील विविध शास्त्रांचे ज्ञानही आत्मसात करणे आवश्यक आहे. संस्कृत भाषेच्या अध्ययनाने व्यक्तिमत्त्वाचा सर्वागीण विकास होतो. भाषा, संस्कार, विचार, संस्कृती, कला, विज्ञान आदीचे भांडार म्हणजे संस्कृत भाषा होय, असेही ते म्हणाले.

उदय सामंत म्हणाले की, संस्कृत भाषा ही मातृभूत असून महाराष्ट्रात तिचा सन्मान करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनीही संस्कृत भाषेचे महत्त्व जाणले होते. त्यामुळे विद्यार्थी आणि समाजापर्यंत ही भाषा अधिकाधिक पोहोचवली पाहिजे.

स्वागतपर भाषण संस्कृत महोत्सवाचे समन्वयक प्रो. कृष्णकुमार पांडे यांनी केले, तर प्रास्ताविकातून श्रीनिवास वरखेडी यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. या वेळी राष्ट्रीय संस्कृत संस्थेचे माजी कुलगुरू व्ही. कुटुंबशास्त्री यांना ‘प्राच्यविद्यावाचस्पती’ या उपाधीने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिनकर मराठे आणि डॉ. रेणुका बोकारे यांनी केले, तर आभार प्रो. विजयकुमार यांनी मानले.

शैक्षणिक धोरणात संस्कृतला महत्त्व!

संस्कृत केवळ भाषा नाही, तर ज्ञान विज्ञान संशोधन आणि नवनव्या कल्पनांचे भांडार आहे. भारतीयांचा मूल्यविचार संस्कृतमध्ये आहे. विविध शास्त्रांचा कोश संस्कृतात आहे. संस्कृतचे हे महत्त्व लक्षात घेऊन नवीन शैक्षणिक धोरणात संस्कृतला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे, असे रमेश पोखरियाल यांनी या वेळी सांगितले.

संस्कृत संभाषण वर्गाला उदंड प्रतिसाद 

पुणे : ज्ञानभाषा समजल्या जाणाऱ्या संस्कृतच्या मोफत ऑनलाइन संभाषण वर्गाला उदंड प्रतिसाद लाभत आहे. विविध वयोगटांतील बाराशेहून अधिक जणांनी नोंदणी करून संस्कृत संभाषण शिकण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. करोना आपत्तीच्या निमित्ताने सगळे व्यवहार थंडावले असताना मिळालेल्या सुटीचा लाभ घेत संस्कृत भाषा शिकणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे.