महेश बोकडे

राष्ट्रीय परीक्षण आणि अंशशोधन प्रयोगशाळा प्रत्यायान मंडळाने (एनएबीएल) नवीन पोर्टल विकसित केले आहे. त्यानुसार शासकीय व खासगी प्रयोगशाळांना त्यांच्याकडे करोना चाचणी केंद्रासाठीच्या सोयी असल्यास सर्व विषाणूजन्य आजाराच्या प्रयोगशाळेऐवजी केवळ करोना चाचणी केंद्रासाठीही अर्ज करता येईल. यामुळे प्रयोगशाळेतील पायाभूत सोयींसह इतर अटी कमी होऊन दोन ते तीन दिवसांतच मंजुरी मिळू शकेल.

भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषदेच्या (आयसीएमआर) मंजुरीशिवाय विषाणूजन्य प्रयोगशाळा सुरू होऊ शकत नाही. आयसीएमआरकडे अर्ज करण्यापूर्वी संबंधित प्रयोगशाळेला एनएबीएलची मंजुरी लागते. एनएबीएलकडून या प्रयोगशाळेतील पायाभूत सुविधा, मनुष्यबळ, तेथील तपासणीचा दर्जा बघितला जातो. या मंजुरीचे प्रमाणपत्र आयसीएमआरला मिळाल्यावर प्रयोगशाळेत तपासणी सुरू होण्याचा मार्ग मोकळा होतो. पूर्वी एनएबीएलकडे सर्व विषाणूजन्य आजाराच्या प्रयोगशाळेसाठीच अर्ज करावा लागत होता. त्यामुळे विविध विषाणूजन्य तपासणीशी संबंधित यंत्रासह इतरही पायाभूत सुविधा प्रयोगशाळेत आवश्यक होत्या.

दरम्यान, एकही सुविधा अपुरी असल्यास मंजुरी लांबणीवर जात होती. करोना चाचणी केंद्र वाढत नसल्याने निश्चितच तपासणीचे प्रमाणही कमी असायचे. हा त्रास कमी करण्यासाठी एनएबीएलने एक विशिष्ट पोर्टल विकसित केले आहे. त्यात करोना चाचणी सुरू असलेल्या आणि या चाचण्या सुरू करण्यास इच्छुक असलेल्या केद्रांना निवेदन करण्यासाठी दोन विकल्प दिले  आहेत. त्यात नवीन इच्छुकांना केवळ  करोना चाचणी केंद्रासाठी अर्ज, नावासह इतर सर्वच माहिती अपलोड करावी लागेल. तेथे एनएबीएलचा अधिकारी जाऊ शकत असल्यास प्रत्यक्ष अथवा तेथे जाणे शक्य नसल्यास  ऑनलाइन कॅमेऱ्याच्या माध्यमातून निरीक्षण केले जाईल. त्यात संबंधित केंद्राच्या संचालकाला एक प्रतिज्ञापत्र देऊन त्यात तेथील सुविधेची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर केवळ दोन ते तीन दिवसांतच मंजुरी मिळणे शक्य होईल.

केंद्रात या गोष्टी हव्यात: आरटी- पीसीआर यंत्र, बायोसेफ्टी कॅबिनेट- २, टेक्निशियन, कोल्ड सेफ्टी फ्यूज, लॅमिनर एअर फ्लो, थर्मोसायक्लर, वॉटर क्युरिफिकेशन सिस्टम, उणे २० अंश फ्रिजर, उणे ८० अंश फ्रिजर, पीसीआर- वर्कस्टेशन, साधे फ्रीज, मायक्रोबायलॉजिस्ट किंवा पॅथोलॉजिस्ट. पोर्टलवर अर्ज केल्यावर संबंधितांना एक वन टाइम पार्सवर्ड मिळेल. त्यात संपूर्ण माहितीसह आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतील. त्यानंतर एनएबीएलचे अधिकारी सुविधांसह तपासणीचा दर्जा व तेथील तपासणीसाठी आवश्यक साहित्यांची खात्री करून तीन दिवसांतच मंजुरी देतील.

– डॉ. व्यंकटेश्वरन, मुख्य कार्यकारी अधिकारी, एनएबीएल