20 October 2019

News Flash

शहरात व्यक्तिमत्त्व विकास शिबिरांचे पेव

नंदनवन भागात एकाच परिसरात तीन ठिकाणी नृत्य शिबीर आयोजित करण्यात आले असून प्रत्येक शिबिराचे शुल्क वेगवेगळे आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

महिनाभरासाठी पाच ते सहा हजार शुल्क

शहरातील विविध भागात सध्या व्यक्तिमत्त्व विकास  शिबिरांचे पेव फुटले असून त्यात ५०० रुपयांपासून ६ हजार रुपये शुल्क घेऊन विद्यार्थ्यांचे ‘व्यक्तिमत्त्व’ घडवण्याचे दावे केले जात आहेत. यातील काही संस्थांचा उद्देश विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना विकसित करण्याचा असला तरी बहुतेक संस्था मात्र अशा शिबिरांकडे व्यावसायिकदृष्टय़ाच बघत आहेत. त्यामुळे अशा शिबिरांचे दरही प्रचंड आहेत.

शहरातील जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळांना शनिवारी सुटय़ा लागल्यानंतर आता एकदम २६ जूनला शाळा सुरू होणार आहेत.  जवळपास दोन महिने सुटय़ा असल्यामुळे मुलांनी काय करावे, हा प्रत्येक पालकांसमोर प्रश्न असतो. त्यामुळे पालकही वेगवेगळ्या शिबिराचा शोध घेत मुलांना  सुटय़ामध्ये सकाळ-सायंकाळ व्यस्त ठेवत असतात. यातूनच व्यक्तिमत्त्व विकास शिबिरांची संख्या वाढत आहे.

नंदनवन भागात एकाच परिसरात तीन ठिकाणी नृत्य शिबीर आयोजित करण्यात आले असून प्रत्येक शिबिराचे शुल्क वेगवेगळे आहेत. याशिवाय हस्तकला आणि हस्ताक्षर सुधार शिबिरासाठी वेगवेगळे शुल्क घेतले जात आहे. दोन महिन्यात गाणी शिकण्यासाठीही शिबीर आहे. लक्ष्मीनगरातील बालजगतमध्ये वेगवेगळ्या कला शिकवणारे शिबीर सुरू झाले असून त्या ठिकाणी वेगवेगळ्या कलांसाठी वेगवेगळे शुल्क आकारले जात आहे. याशिवाय मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी काही सांस्कृतिक संस्थांनी नाटय़ शिबीरही आयोजित केले आहेत.

शाळेत प्रवेश घेण्यासाठी जशी पालकांना कसरत करावी लागत असते, तशीच शहरातील काही शिबिरात  प्रवेश मिळवण्यासाठी पालकांना धडपड करावी लागत आहे.

शिबिरांमध्ये अनेक विद्यार्थ्यांची नावे  ‘प्रतीक्षेत’ असून जागा असेल तर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, अशा सूचना लिहिल्या जात आहेत. रेशीमबाग परिसरात केवळ मेहंदी काढण्याच्या शिबिरासाठी महिनाभराचे दीड हजार रुपये तर दसरा रोड येथील कलार्जन इन्स्टिटय़ूट या संस्थेच्या शिबिरात प्रत्येक कलेसाठी प्रतिमहिना १ हजार रुपये शुल्क आकारले जात आहे.

शैक्षणिक संस्थांचाही पुढाकार

लक्ष्मीनगरात बालजगत, मनोरमा आर्ट्स, कलार्जन फाऊंडेशन, हार्मोनी, कस्तुरबा भवन, ग्रीन सिटी, बसोली, प्रहार, आलाप, कलारंजन आदी ५० पेक्षा अधिक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी शिबिरे आयोजित केली आहेत. यातील काही शिबिरे १० ते १५  दिवसांची तर काही एक महिन्याची असून त्यासाठी ५०० ते २ हजार रुपये आणि महिनाभराच्या शिबिरासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून पाच ते सहा हजार रुपये आकारले जात आहेत.

आठ दिवसात कुठली कला शिकणार?

मुलांनी सुटय़ामध्ये कुठली तरी कला शिकावी म्हणून शिबिरात पाठवले जाते. घरी टीव्ही आणि मोबाईलशी खेळण्यापेक्षा शिबिरात मुले व्यस्त असली की मुलांच्या ज्ञानात भर पडत असते. शिबिराचे शुल्क घेण्यास हरकत नाही. मात्र आठ दिवसांचे हजार रुपये घेतले जात असेल तर ते चुकीचे आहे. आठ दिवसात मुलगा कुठलीही कला आत्मसात करू शकत नाही. किमान दोन महिन्याच्या शिबिरात प्राथमिक माहिती होऊ शकते.

– महेश केळापुरे, लक्ष्मीनगर व्यावसायिक

दृष्टिकोन नसावा

अशी शिबिरे आयोजित करताना त्यात व्यावसायिक दृष्टिकोन नसावा आणि तो असेल तर त्यातून विद्यार्थ्यांना आपण काय देतो, याचा विचार शिबीर प्रमुखांनी  केला पाहिजे. पालकांनी सुद्धा मुलांना कुठल्या शिबिरात टाकावे, याबाबत माहिती घेणे आवश्यक आहे.

– राजेश समर्थ, शिबीर प्रमुख, हार्मोनी संस्था.

First Published on April 18, 2019 1:09 am

Web Title: personality development camp in the city