‘भीम’ या शब्दाला जातिवाचक व धार्मिक समजून भीम सेना अशा नावाने पक्षाची नोंदणी करण्यास नकार देणाऱ्या निवडणूक आयोगाविरुद्ध उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेण्यात आली आहे. या याचिकेवर न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली असून आठ आठवडय़ांत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.

गरिबांच्या लढय़ासाठी भीम सेना या राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या पक्षाचे कार्य नागपुरात चालते. पक्षाच्या नेत्यांनी २० जून २०१६ ला निवडणूक आयोगाकडे अर्ज करून नोंदणीची विनंती केली, परंतु निवडणूक आयोगाने ‘भीम’ हा शब्द धार्मिक आहे, या शब्दाच्या नावाने नोंदणी करता येणार नाही, असे स्पष्ट करून अर्ज फेटाळला. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या नावातून भीम हा शब्द घेण्यात आला आहे. देशात भीम नावाचा कोणताही धर्म किंवा जात नाही. नोंदणी अर्जासोबत पक्षाने सर्व आवश्यक दस्तऐवज जोडले असताना भीम शब्द धार्मिक असल्याचा ठपका ठेवून नोंदणी नाकारणे असंवैधानिक आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द ठरवून त्यांना पक्षाची नोंदणी करण्याचे आदेश देण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. प्रदीप वाठोरे आणि निवडणूक आयोगातर्फे अ‍ॅड. नीरजा चौबे यांनी बाजू मांडली.