नागपूर : बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या एका गतिमंद मुलीचा २२ आठवडे ९ दिवसांचा गर्भ पाडण्यासाठी तेजस जस्टीस फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्या. सुनील शुक्रे आणि न्या. अविनाश घारोटे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) वैद्यकीय मंडळाला गर्भवती महिलेच्या सर्व तपासण्या करून १२ फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

गडचिरोली जिल्हयातील एका गतिमंद मुलीवर बलात्कार करण्यात आला. यातून गतिमंद मुलगी गर्भवती झाली.  या प्रकरणात वडसा, देसाईगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तेजस जस्टीस फाऊंडेशनच्या विमल रामदास रामटेके यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरकडे तिचा गर्भपात करण्याची विनंती केली. पण, डॉक्टरांनी गर्भ हा २२ आठवडे ९ दिवसांचा असल्याने  नकार दिला. गर्भपातासाठी न्यायालयाच्या आदेशाची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.   याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. एन. टी. ग्वालबंश आणि अ‍ॅड. राजेश नायक यांनी काम पाहिले.