News Flash

कारवाईच्या नावाखाली कोटय़वधींची वसुली

पेट्रोल पंप छापेप्रकरणी ठाणे पोलिसांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

( संग्रहीत छायाचित्र )

पेट्रोल पंप छापेप्रकरणी ठाणे पोलिसांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

पेट्रोल पंपांवरील तांत्रिक घोळ उघडकीस आणण्याच्या कारवाईच्या नावाखाली ठाणे पोलिसांनी राज्यभरातील पेट्रोल पंप चालकांकडून कोटय़वधी रुपये उकळल्याची तक्रार नागपुरातील एका पेट्रोल पंप चालकाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालकांकडे केली आहे. या प्रकरणी सखोल चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे.

इलेक्ट्रॉनिक चिपच्या माध्यमातून इंधनचोरी करून पेट्रोल पंपचालक ग्राहकांची लुबाडणूक करीत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर ठाणे पोलिसांनी जून, जुलै, ऑगस्ट २०१७ मध्ये राज्यातील संशयित पेट्रोल पंपांवर छापे घातले. यात नागपुरातीलही पेट्रोल पंपांचा समावेश आहे. ठाणे पोलिसांच्या कारवाईमध्ये इंडियन ऑईल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्याच पंपांचा समावेश आहे. या प्रकरणात कारवाईचा धाक दाखवून ठाणे गुन्हे शाखा पोलिसांच्या पथकाने अनेक पेट्रोल पंप चालकांकडून कोटय़वधी रुपये उकळल्याची तक्रार मुख्यमंत्री, गृह सचिव, पोलीस महासंचालक, सीबीआय आणि ठाणे आयकर आयुक्तांकडे केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या तक्रारीत नागपुरातील दोन व्यापाऱ्यांना हाताशी धरून पोलिसांनी कारवाई केल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही तक्रार रोहित शर्मा यांच्या नावे आहे.

उच्च न्यायालयात आव्हान

पोलिसांनी केलेल्या कारवाईला काही पेट्रोल पंप चालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. नागपुरात तीन आणि मुंबईतील दोन गुन्ह्य़ांचा तपास, गुन्हा व आरोपपत्र दाखल करण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयानेही ठाणे पोलिसांकडे स्पष्टीकरण मागितले आहे.

ठाणे पोलीस आयुक्तांनी केलेल्या आरोपाने आश्चर्य वाटले. त्यांचे सर्व आरोप निराधार आहेत.  – नवनीतसिंग तुली, पेट्रोल पंपचालक, नागपूर

या प्रकरणात पोलिसांनी अतिशय चांगली व लोकहिताची कारवाई केली आहे. यात कोणत्याही स्वरूपाचा गैरव्यवहार झालेला नाही. नागपुरातील नवनीतसिंग तुली हे जाणीवपूर्वक असे आरोप करीत असून, निनावी तक्रार करीत आहेत. आरोपींच्या तक्रारींवर किती विश्वास ठेवायचा, असा प्रश्न आहे. – परमबीर सिंग, पोलीस आयुक्त ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2017 1:42 am

Web Title: petrol pump scam in mumbai
Next Stories
1 संत्री निर्यातीसाठी विदर्भात दोन प्रकल्प
2 राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयात दीनदयाल थाळी उपक्रम – मुख्यमंत्री
3 गुजरात निकालावरच अधिवेशनातील कामकाचाचा कल
Just Now!
X