‘पीओएस’ बंद असल्याचे कारण देऊन कार्ड स्वीकारण्यास नकार

नोटबंदीनंतर काही महिने रोकडरहित व्यवहार करण्यास प्राधान्य देणाऱ्या पेट्रोल पंप संचालकांकडून आता ग्राहकांना रोख रकमेत व्यवहार करण्यास अप्रत्यक्षपणे भाग पाडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘कॅशलेश इंडिया’च्या संकल्पनेला हरताळ फासला  जात आहे.

रोकडरहित व्यवहारला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने नोटबंदीनंतर ‘कॅश फ्लो’ कमी केला. पेट्रोलचे देयक डेबिट कार्डने चुकते करताना लागणारे अतिरिक्त शुल्क रद्द केले. यामुळे पेट्रोल पंपावर कार्डने पेट्रोल भरणाऱ्यांची संख्या अनेक पटीने वाढली, परंतु आता शहरातील अनेक पेट्रोल पंपवर ‘पाईन्ट ऑफ सेल’ (पीओएस) मशीन बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. काही पेट्रोल पंपवर तर क्रेडिट, डेबिट कार्ड ‘स्व्ॉप मशीन’ बंद असल्याचे फलक लावण्यात आले आहे. पीओएस यंत्र बिघडले आहे, इंटरनेट काम करत नाही, अशी कारणे देत ग्राहकांना रोकड व्यवहार करण्यास बाध्य केले जात आहे.

दुचाकी चालकांना असा अनुभव अधिक येत आहे. दुचाकीमध्ये शंभर ते दोनशे रुपयांचे पेट्रोल भरण्याचे प्रमाण अधिक आहे. याची कल्पना पेट्रोल भरून देणाऱ्या कर्मचाऱ्याला असते. यामुळे तो दुचाकी चालक ग्राहकांना पेट्रोल देण्यापूर्वीच कार्ड चालणार नाही, मशीन बंद  आहे, असे सांगतो.

लॉ कॉलेज चौकातील पेट्रोल पंप आणि संविधान चौकातील पंपवर पेट्रोल भरणाऱ्या अनेक दुचाकी चालकांनी याबाबत लोकसत्ताकडे तक्रार केली आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी कुणाल मुळे याने लॉ कॉलेज चौकातील भारत पेट्रोलियमच्या पंपवर १०० रुपयांचा पेट्रोल भरले. पेट्रोल पंपवर येताच येथील कर्मचाऱ्याने कार्ड चालणार नाही, मशीन बंद आहे, असे  त्याला सांगितले.

संविधान चौकातील पेट्रोल पंपवर गेल्या महिनाभरापासून डेबिट आणि क्रेडिट कार्डचे मशीन बंद असल्याचे फलक लागले आहेत. अशाप्रकारे रोख रकमेने व्यवहार करण्यास ग्राहकांना प्रवृत्त केले जाते. विशेष म्हणजे, हा पेट्रोल पंप इंडियन ऑईल कंपनीतर्फे संचालित केला जात आहे.

दरम्यान, काही पंप चालक ‘कार्ड स्व्ॉप’ करण्यासाठी लागणारा वेळ वाचावा म्हणून अशा क्लृप्त्या वापरत असल्याचे समोर आले आहे. मात्र, पेट्रोल डिलर्स असोसिएशनने मशीनमधील बिघाड आणि इंटरनेट समस्या हेच कारण असल्याचे म्हटले आहे. पेट्रोल पंप संचालकांनी बँकेत एक लाखाची रोकड जमा केल्यास त्यासाठी १०० रुपये शुल्क भरावे लागते. यामुळे पेट्रोल पंप चालक रोख रक्कम स्वीकारून स्वत:चे नुकसान करणार नाही. डेबिट कार्डने केलेले दोन हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारावर कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही.

मात्र, क्रेडिट कार्डने व्यवहार केल्यास शुल्क आकारले येते. यामुळे ग्राहकांना शंभर, दोनशे रुपयांचे पेट्रोल न भरता पाचशे रुपयांचा सल्ला दिला जातो, असेही असोसिएशनचे म्हणणे आहे.

‘‘ग्राहकांच्या पसंतीनुसार पेट्रोल पंपवर डेबिट, क्रेडिट कार्डने किंवा रोकडीचा व्यवहार केला जात आहे. प्रत्येक पेट्रोल पंपवर पीओएस मशीन आहेत. इंटरनेटची समस्या असल्यास एखाद वेळेस यंत्र बंद राहू शकते. तसे नसताना ग्राहकांना रोकड देण्यास बाध्य करणे चुकीचे आहे.’’

अमित गुप्ता, अध्यक्ष, विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन.