सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
नागपूर : एकीकडे घरगुती सिलेंडरवरील अनुदान टप्प्याटप्प्याने कमी केली असून दुसरीकडे केंद्र सरकारने दररोजची इंधन दरवाढही कायम ठेवली आहे. गुरुवारी शहरात पेट्रोलचे दर ९६.३५ असून डिझेलचे दर ८७.८६ झाले आहेत. पॉवर पेट्रोलने तर शंभरीच गाठली आहे. त्यामुळे सर्वसामन्यांना सिलेंडर व पेट्रोलच्या दुहेरी दरवाढीचा सामना करावा लागत आहे. एकीकडे शहरात करोनाचा प्र्दुभाव वाढत असून दुसरीकडे पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे महागाईचा भडका उडत आहे. कच्च्या इंधनतेलाचे भाव कमी असतानाही पेट्रोलचे दर झपाटय़ाने वाढत आहेत. शहरात महिन्याच्या सुरुवातीला पेट्रोल प्रतिलिटर ९३.३५ रुपये होते. मात्र आज ते ९६.३५ रुपयांवर गेले असून १८ दिवसात तब्बल ३.४६ रुपये वाढ झाली. डिझेलचा दर १ फेबुवारीला ८३.८४ होता.आता ते ८७.८६ रुपये प्रति लिटर झाले असून त्यात ४.०२ रुपये दरवाढ झाली आहे.
फेब्रुवारीत पेट्रोल ३.४६ आणि डिझेल ४.०२ रुपयांनी महागले. पेट्रोलपेक्षा डिझेलची दरवाढ अधिक आहे. डिझेल दरवाढीचा थेट परिणाम महागाईवर होणार असून त्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. दुसरीकडे पॉवर पेट्रोलने शंभरी गाठली आहे. शहरात पेट्रोलच्या दराची शतकाकडे आगेकूच होत आहे. यामुळे सर्वत्र ओरड होत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 19, 2021 12:40 am