महेश बोकडे

करोना प्रतिबंधात्मक लसीची मात्रा घेतल्यावर दिल्या जाणाऱ्या लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असल्याने वैद्यकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सध्या दुसरी लस दिलेल्यांच्या भ्रमणध्वनीवर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने विकसित केलेल्या यंत्रणेद्वारे एक संदेश येतो. त्यावरील लिंक उघडल्यास  प्रमाणपत्रावर लाभार्थ्यांचे नाव, लिंग, ओळख क्रमांक, लसीकरणाची तारीख, कोणती लस दिली याबाबत माहिती  दिसते. त्यात ‘दवाई भी और कडाई भी’ या संदेशासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र आहे. हे छायाचित्र बघून वैद्यकीय क्षेत्रात सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही प्रकारची चर्चा रंगली आहे. आतापर्यंत लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या बीसीजी, त्रिगुणी लस, पोलिओ लस, गोवरसह इतर लशीकरणाच्या नोंदीच्या कागदांवरही कधी कोणत्याही नेत्याचे छायाचित्र नव्हते, अशी चर्चा वैद्यकीय क्षेत्रात तसेच लाभार्थ्यांमध्ये होत आहे.

आरोग्य अधिकारी म्हणतात..

करोना लशीकरणाशी संबंधित कामाचा व्याप आहे. त्यामुळे या विषयाची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय काहीही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक आरोग्य विभागातील लशीकरणाशी संबंधित अधिकारी दिलीप पाटील यांनी दिली. आरोग्य उपसंचालक अर्चना पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

लसीकरण प्रमाणपत्रावर जनजागृतीसाठी एखादा संदेश ठीक आहे. परंतु पंतप्रधानांचे छायाचित्र वापरण्याची नवीन प्रथा चुकीची आहे. तातडीने हे छायाचित्र काढून  वाद टाळायला हवा.

– त्रिशरण सहारे, अध्यक्ष, विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य सेवा कर्मचारी    संघटना (इंटक).