17 December 2017

News Flash

शारीरिक कष्ट वाचवणाऱ्या तीन यंत्रांना पेटंट

नोकरदार महिला असो वा गृहिणी. स्वयंपाकघरात स्त्रियांचा वावर जास्त असतो.

ज्योती तिरपुडे, नागपूर | Updated: October 11, 2017 3:21 AM

‘व्हीएनआयटी’च्या डॉ. रश्मी उद्दानवडीकर यांचे संशोधन

व्यक्ती आणि तिचा सभोवताल काम करण्यासाठी पूरक असावा अन्यथा त्यातून आरोग्याचे भीषण परिणाम उद्भवतात, या गृहितकावर आधारित अभियांत्रिकीची कार्यक्षमताशास्त्र (अर्गोनॉमिक्स) ही शाखा काम करीत असून अलीकडेच या शाखेंतर्गत तीन यंत्र तयार करून व्हीएनआयटीच्या एका प्राध्यापकाने पेटंट मिळवले आहे. ही यंत्रे समाजभिमूख असून लोकांना काम करताना सोपे जावे, म्हणून तयार करण्यात आली आहेत.

नोकरदार महिला असो वा गृहिणी. स्वयंपाकघरात स्त्रियांचा वावर जास्त असतो. मात्र, त्याठिकाणी वस्तू कशा ठेवाव्यात, किती उंचीवर असाव्यात, कोणत्या बाजूला असाव्यात हा कार्यक्षमताशास्त्राचा अविभाज्य भाग समजला जातो. कढईत शेंगदाणे किंवा रवा भाजणे त्रासदायक होते. तसेच रेस्टॉरंटमध्ये समोसे तळतात ते न फुटता उलटवणे, गरम तेलात थंड तेल कढईत ओतणे किंवा कढई थंड करण्यासाठी गॅसच्या शेकडीवरून बाजूला काढून ठेवणे यासारख्या वारंवार घडणाऱ्या क्रिया समोसे काढणारा करीत असतो. त्या अतिशय जोखमीच्या असून त्यातून अपघात संभवतात. अगरबत्ती बनवताना मिश्रण काडीला लागेस्तोवर चोळत राहणे यातून बऱ्याच स्त्रियांना रोजगार उपलब्ध झालेला असतो. मात्र, त्यासाठी या स्त्रिया फार मोठी किंमत चुकवत असतात. यातही बरीच जोखिम असल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. सामान्यांचा या क्षेत्रातील त्रास ओळखून व्हीएनआयटीतील कार्यक्षमताशास्त्राच्या प्राध्यापक डॉ. रश्मी उद्दानवडीकर यांनी तीन यंत्र तयार करून त्याचे पेटंटही मिळवले आहेत. त्यात भाजण्याचे यंत्र, अगरबत्तीचे यंत्र आणि तिसरे तळण यंत्राचा समावेश आहे. गडचिरोली भागात अगरबत्तीचे काम करीत असताना स्त्रियांना पाठीचे, हाताला, कमरेला त्रास होत असे. तेथील एका वन अधिकाऱ्याने निधी पुरवून हे यंत्र बनवून घेतले. यंत्रावर सध्या एक तासात ५० अगरबत्ती तयार होतात. शिवाय यंत्र हाताने चालवायचे असल्याने स्थानिक नागरिकांचा रोजगार कायम राहिला मात्र, त्रासदायक शारीरिक कामांतून सुटका मिळाली. अगरबत्तीच्या यंत्रासाठी के. चंद्रकांत, प्रा. पडोळे, हर्षिनी आणि प्रा. रश्मी उद्दानवडीकर यांनी काम केले आहे. तळण यंत्रासाठी जितेश देशमुख आणि व्ही.सी. भुजाडे यांचे सहकार्य लाभले आहे तर भाजण यंत्रासाठी योगेश धनिक यांनी मेहनत घेतल्याचे डॉ. उद्दानवडीकर यांनी सांगितले.

कार्यक्षमताशास्त्राचे महत्त्व

व्यक्ती आणि त्याच्या कामाच्या ठिकाणाचा सापेक्षरित्या केलेल्या अभ्यासाला कार्यक्षमताशास्त्र संबोधिले जाते. अभियांत्रिकीच्या क्षेत्रात नावारूपाला येत असलेली ही शाखा व्यक्ती आणि कामाच्या ठिकाणचे पूरक पर्यावरण यावर विशेष भर देते. या कार्यक्षमताशास्त्राकडे दुर्लक्ष केल्यामुळेच मानेचे, पाठीचे, कमरेचे आणि गुडघ्याचे आजार संभवतात.

उपयोगी यंत्रे : कार्यक्षमताशास्त्रात रोजच्या जगण्यातील अनेक गोष्टींचा समावेश आहे. मात्र, सामान्यत: तिकडे लक्ष जात नाही. घरकाम करणारे स्त्री किंवा पुरुष बसून फरशी पुसतात . त्यापेक्षा उभ्याने हे काम करता येतो. तेच झाडण्याच्या बाबतीतही आहे. मोठय़ा हॉटेल्समध्ये उपमा, शिरा किंवा मसाला भाजताना तो मोठय़ा कढईमध्ये भाजला जातो. तासन्तास उभे राहण्यापेक्षा भाजण यंत्राच्या उपयोग त्याठिकाणी होऊ शकतो. तळण यंत्रे आज घडिला मॅकडोनल्डमध्ये वापरली जातात. फ्रेंच फ्राईजही अशाच प्रकारे तळले जातात. मात्र, व्हीएनआयटीमध्ये तयार करण्यात आलेल्या तळण यंत्रात पदार्थ उलटणे, तेल गाळणे, तेलाचे तपमान नियंत्रित करणे ही प्रक्रिया तळण करतानाच पार पाडता येते.

पेनाचा आकार कसा असावा? म्हणजे त्याने लिहिल्यानंतर बोट दुखू नयेत, हा साधा नियम पेनाला लावायला हवा. त्याचबरोबर स्वंयपाक घरात पाण्याचे भांडे, गॅसची शेगडी आणि फ्रीजची जागा विशिष्ट ठिकाणी हवी. तर हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ तळताना कढई आणि उलथणे किंवा झाऱ्याची कमीत कमी हालचाल करणे शक्य व्हावे म्हणून तळण्याचे यंत्र बनवले आहे. या तिन्हीचे पेटंट आम्ही घेतले आहे. कोणत्याही व्यक्तीने शरीराला अधिक कष्ट देऊन काम करू नये.

डॉ. रश्मी उद्दानवडीकर, प्राध्यापक, एर्गोनॉमिक्स इंजिनिअरिंग, व्हीएनआयटी

First Published on October 11, 2017 3:21 am

Web Title: physical pain patents to three machines