महेश बोकडे, नागपूर

देशात उष्माघाताचे वाढते रुग्ण व त्यामुळे होणाऱ्या मृत्यूवर नियंत्रणासाठी केंद्र सरकारने नागपूर, राजकोट आणि झाशी या तीन शहरात पथदर्शी प्रकल्प कार्यान्वित करण्याचे निश्चित केले आहे. तो पुढे देशभरात राबवला जाईल. प्रकल्पानुसार तिन्ही शहरातील रस्ते, इमारतीच्या नकाशांसह इतरही क्षुल्लक गोष्टींवर तापमान कमी करण्याच्या दृष्टीने लक्ष केंद्रित केले जाणार आहे. निवडणूक आचारसंहिता संपताच हे काम सुरू होणार आहे.

केंद्र सरकारच्या हवामान बदल राष्ट्रीय मिशन आणि विज्ञान प्रौद्योगिकी मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबवला जाणार आहे. त्यानुसार तिन्ही शहरातील महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध विभागांमध्ये अंतर्गत समन्वय वाढवून अ‍ॅलर्ट देणारी यंत्रणा कार्यान्वित होईल. तिला हवामान खात्याशी जोडले जाईल. तेथून पुढच्या काही दिवसांमध्ये तापमान वाढण्याचा अंदाज येताच महापालिकेतील सर्व यंत्रणा सतर्क होतील. तापमान जास्त असलेल्या कालावधीत शहरातील शाळांच्या वेळापत्रकांत बदल,  बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या वेळांत बदल केले जातील.

शहरातील सर्व इमारतींच्या छतांना पांढरा रंग असल्यास तापमान सुमारे तीन ते चार चार अंशाने खाली येते, त्यामुळे नागरिकांना त्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. शहरातील सिमेंटचे रस्ते व फ्लोरिंगमुळे जमिनीत पाणी झिरपण्यासाठी जागा शिल्लक नाही. त्यामुळे या प्रकल्पाअंतर्गत पाणी झिरपण्यासाठी रस्त्यांमध्ये सुधारणा केली जाईल. उन्हाशी संबंधित आजाराबाबत सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांतील नोंदणीला शिस्त लावी जाईल, त्याचा अभ्यास केला जाईल. शहरात होणाऱ्या रोजच्या मृत्यूवर लक्ष ठेवून त्यात कमी- जास्त तफावत आढळल्यास तातडीने संशोधनात्मक अभ्यास केला जाईल. सर्व शासकीय व महापालिकांच्या रुग्णालयांत उष्माघातापासून वाचवण्यासाठी उपचाराच्या सर्व अद्ययावत यंत्रणा उपलब्ध केल्या जातील. सोबत शहरात भविष्यात तयार होणाऱ्या इमारतींसह रस्त्यांसाठी नवीन नियम तयार केले जाणार आहेत.

गांधीनगरच्या धर्तीवर प्रकल्प

गुजरात येथील गांधीनगर शहरात सुरू असलेल्या प्रकल्पाच्या धर्तीवर हा प्रकल्प राहणार आहे. गांधीनगर येथे मे- २०१० या महिन्यात अचानक बेवारस व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण वाढले होते. नेहमीच्या तुलनेत ते दीड पटींनी वाढल्याने इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक हेल्थ या संस्थेकडून अभ्यास केला गेला. राज्य शासनाच्या सूचनेवरून या शहरात विविध उपाय केले गेले. त्यानंतर तेथील उष्माघाताशी संबंधित मृत्यू मोठय़ा संख्येने कमी होण्यास मदत झाली होती. त्या धर्तीवर देशातील तीन शहरात हा प्रकल्प राबवला जाणार आहे.

इस्रो सॅटेलाईटवरून अभ्यास

नवीन प्रकल्पानुसार देशातील तिन्ही शहरातील सर्वच भागांचा इस्रोच्या सॅटेलाईटवरून अभ्यास केला जाणार आहे. त्यात सर्वाधिक तापणाऱ्या भागाची माहिती घेत त्यावर जास्त लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

उष्णाघाताचे रुग्ण व त्यामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी केंद्राने देशातील तीन शहरात पथदर्शी प्रकल्प सुरू करण्याचे निश्चित केले आहे. आचारसंहितेनंतर तातडीने त्याची अंमलबजावणी केली जाईल. त्यासाठी तिन्ही शहरातील महापालिकेतील आरोग्य विभागाच्या काही अधिकाऱ्यांना प्रशिक्षणही दिले आहे. या प्रकल्पानुसार उन्हाळ्यात लिंबू पाणी, आंब्याचा पन्ह्य़ासह इतर पेय व खाद्यपदार्थ खाण्याबाबत जनजागृती केली जाईल.’

– डॉ. महावीर गोलेच्छा, मुख्य प्रकल्प अधिकारी, हवामानातील बदल प्रकल्प, गांधीनगर.