News Flash

केंद्राच्या निर्णयानंतर लगेच प्लाझ्मादान शिबिरांना ‘ब्रेक’!

भाजप ओबीसी मोर्चाकडून पूर्व नागपुरात १९ मे रोजी प्लाझ्मा दान शिबीर आयोजित करण्यात आले होते.

गडकरींच्या वाढदिवसानिमित्तही शिबीर सुरू होत

नागपूर : केंद्र सरकारच्या टास्क फोर्सकडून करोनाच्या प्रौढ रुग्णांवरील उपचारातून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आले आहे. त्यामुळे मंगळवारी तडका-फडकी नागपुरातील प्लाझ्मा दान शिबिरांवर बहुतांश आयोजकांकडून ब्रेक लावण्यात आले आहेत. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्तही नागपुरात भाजपकडून पाच ते सहा ठिकाणी प्लाझ्मा दान शिबीर सुरू होते. हेही तातडीने बंद करण्यात आले आहे.

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचा २७ मे रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवशी करोनाचे थैमान बघता कुणीही कार्यकर्त्यांनी भेटवस्तू वा शुभेच्छा देणाऱ्या जाहिरातीवर खर्च करू नये, असे आवाहन गडकरी यांनी केले होते. त्याऐवजी रक्तदानसह इतर शिबिरे घेत सर्वसामान्य नागरिकांना मदत करण्याची विनंती त्यांनी केली होती. त्यावर नागपुरातील भाजपच्या कार्यकत्र्यांसह पदाधिकाऱ्यांकडून शहराच्या विविध भागात पाच ते सहा प्लाझ्मा दान शिबिरांसह इतरही उपक्रम सुरू करण्यात आले होते. आजपर्यंत प्लाझ्मा दान शिबिरातून सुमारे ३०४ पिशव्या प्लाझ्मा गोळाही केला गेला. दरम्यान, केंद्र सरकारने गेल्या काही काळापासून करोना रुग्णांवर उपचारपद्धती म्हणून सुरू असलेल्या प्लाझ्मा थेरपीचा वापराला उपचारातून वगळले आहे. ही माहिती दूरचित्रवानीसह प्रसिद्धीमाध्यमातून पुढे आल्यावर नागपुरातील भाजपसह इतरही संस्थांकडून तातडीने हे शिबीर बंद करत असल्याचे जाहीर केले.

भाजप ओबीसी मोर्चाकडून पूर्व नागपुरात १९ मे रोजी प्लाझ्मा दान शिबीर आयोजित करण्यात आले होते. परंतु तेही केंद्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचनेमुळे रद्द केल्याचे भाजपने स्पष्ट केले. त्यातच वैद्यकीय शिक्षण खात्याने राज्यातही करोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जगातील सर्वात मोठ्या प्लाझ्मा थेरपीबाबतच्या वैद्यकीय चाचणीचा शुभारंभ केला होता. त्याची जबाबदारी नागपूरच्या मेडिकल रुग्णालयाकडे दिली गेली होती. या चाचणीत राज्यातील प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांसह मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांनाही सहभागी केले गेले. परंतु चाचणीत अत्यवस्थ संवर्गातील रुग्णांना या थेरपीने प्लाझ्मा दिल्यावर मृत्यूचे प्रमाण अधिक आढळले होते. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण खात्याने नागपूरच्या मेडिकल, मेयोसह प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील उपचार घेणाऱ्या करोना बाधित रुग्णांवर या थेरपीचा उपचार बंद केला होता.

खासगी रुग्णालयांच्या भूमिकेकडे लक्ष

शहरातील बऱ्याच खासगी रुग्णालयांकडून नातेवाईकांना प्लाझ्मा आणण्यासाठी चिठ्ठी लिहून देत आग्रह धरला जात होता. त्यामुळे बरेच नातेवाईक समाज माध्यमांसह इतर पद्धतीने प्लाझ्मा दाते शोधण्यासह विविध रक्तपेढ्यांमध्ये विशिष्ट ग्रुपचा प्लाझ्मा शोधण्यासाठी फिरताना दिसत होते. त्यातही या प्लाझ्मासाठी शासनाने पेढींना दर निश्चित करून दिले होते. त्यानंतरही अवास्तव शुल्क आकारून ते नातेवाईकांना देत सर्वसामान्यांची लूट सुरू होती. या निर्णयानंतर या रुग्णालयांची भूमिका काय राहणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सोबत जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासन या खासगी रुग्णालयांनी जबरीने कुणाला प्लाझ्मा लिहून दिल्यास त्यावर काय कारवाई करणार? याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

केंद्र सरकार आणि आयसीएमआरच्या नवीन मार्गदर्शक सूचना येताच भाजपकडून सर्व प्लाझ्मा दान शिबीर थांबवण्यात आले आहेत. नवीन मार्गदर्शक सूचना आल्यावर पुढच्या कार्यक्रमांचे नियोजन केले जाईल.– कृष्णा खोपडे, आमदार, भाजप.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 12:08 am

Web Title: plasma donation camps break immediately after centre government decision akp 94
Next Stories
1  ‘महाज्योती’ची अन्यायकारक जाहिरात
2 करोना योद्धे शिक्षक दोन महिन्यांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत
3 योजना कागदावरच,पण नाकाडोंगरी पॅटर्न यशस्वी
Just Now!
X