यंत्र खरेदी, मनुष्यबळ प्रशिक्षण प्रक्रियेला गती

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : जगातील काही देशांमध्ये करोनाबाधित रुग्णांवर रक्तद्रव उपचार पद्धती (कॉनव्हॅलसंट प्लाझ्मा थेरपी) प्रभावी ठरत आहे. त्यावर संशोधनासाठी वैद्यकीय शिक्षण खात्याने राज्यातील सर्व १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत रक्तद्रव उपचार वैद्यकीय चाचणीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी यंत्र खरेदी, मनुष्यबळ प्रशिक्षणासह इतर प्रक्रिया सुरू आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास सर्वत्र या पद्धतीचा उपचार  होईल.

भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषदेकडून (आयसीएमआर) राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूरसह देशातील निवडक वैद्यकीय महाविद्यालयांत रक्तद्रव उपचार पद्धतीची वैद्यकीय चाचणी सुरू आहे, तर नागपूरच्या मेडिकलमध्येही लवकरच ती सुरू होईल. जगातील काही देशात ही उपचार पद्धत प्रभावी ठरत आहे. महाराष्ट्रात करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यावर नियंत्रणासाठी वैद्यकीय शिक्षण खात्याकडून विविध स्तरावर नवनवीन पद्धतीने उपचाराचे प्रयत्न सुरू आहेत. त्याअंतर्गत राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील काही करोनाबाधितांवर रक्तद्रव उपचाराची वैद्यकीय चाचणीही मोठय़ा प्रमाणावर प्रथमच होत आहे.

या प्रकल्पासाठी प्रत्येक महाविद्यालयांत रक्तद्रव संग्रहण, त्यावर प्रक्रिया करण्यासह इतर कामांसाठी आवश्यक यंत्रासह इतर साधनांची खरेदी सुरू झाली आहे. या महाविद्यालयांतील डॉक्टर, तंत्रज्ञांसह इतरांनाही प्रशिक्षण दिले जात आहे. सोबत येथे करोनामुक्त झालेल्यांना रक्तद्रव दान करण्यासाठी समुपदेशन करण्यासह दान देण्यास तयार झालेल्यांची नोंदणी करण्यासाठी एक विभाग

असेल.

मधुमेहासह इतर आजार असलेल्यांचे रक्तद्रव घेतले जाणार नाही. वैद्यकीय चाचणीदरम्यान रक्तद्रवाचे प्रत्यारोपण केलेल्या करोनाबाधित रुग्णावर विशेष लक्ष ठेवले जाईल. तो किती दिवसांत करोनामुक्त झाला अथवा नाही, रक्तद्रव प्रत्यारोपणाचा त्यावर काय परिणाम झाला, इतरही अनेक सूक्ष्म बाबींचा या प्रकल्पात अभ्यास केला जाईल. याचा अहवाल ड्रग्ज कंट्रोल जनरल ऑफ इंडियाला (डीसीजीआय) दिला जाईल. त्यात ही पद्धती प्रभावी ठरल्याचे स्पष्ट झाल्यास डीसीजीआयच्या परवानगीने राज्यभरात ही उपचार पद्धती उपलब्ध होणे शक्य असल्याचेही वैद्यकीय सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.

 

मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांनाही प्रस्ताव

वैद्यकीय शिक्षण खात्याने मुंबई महापलिकेच्या अखत्यारीत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांनाही रक्तद्रव उपचारासाठीच्या वैद्यकीय चाचणीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी होकार दिल्यास तेथेही ही चाचणी होणार आहे.

रक्तद्रव उपचार वैद्यकीय चाचणीमुळे प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अद्ययावत यंत्र उपलब्ध होणार असल्याने रक्तपेढय़ा अद्ययावत होतील. ही चाचणी प्रथम करोनाबाधितांवर होणार आहे. त्याला यश आल्यास भविष्यात इतरही गंभीर आजारांच्या रुग्णांवर रक्तद्रव प्रत्यारोपणाचा उपचार प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत उपलब्ध होऊ शकेल.

– डॉ. संजय मुखर्जी, वैद्यकीय सचिव, वैद्यकीय शिक्षण खाते, मुंबई.