19 January 2019

News Flash

दुखापतींकडे दुर्लक्ष करणे खेळाडूंनी टाळावे!

खेळताना शरीराच्या काही अनपेक्षित हालचालींमुळे स्नायूंवर ताण येऊन दुखापत होते.

डॉ. प्रशांत जगताप यांचा सल्ला; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छ भेट

खेळताना शरीराच्या काही अनपेक्षित हालचालींमुळे स्नायूंवर ताण येऊन दुखापत होते. दुखापत जेवढी गंभीर, तेवढय़ाच वेदना अधिक होतात.  शिवाय अवयवाची हालचाल मंदावते. मात्र अनेकदा खेळाडू दुखापतीकडे दुर्लक्ष करतो आणि नेमके तेच दुखणं भविष्यात गंभीर रुप धारण करते. अशा दुखापतींची वेळीच काळजी घेणे गरजेचे असते, असे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ व ऑर्थोस्कोपिक सोसायटी नागपुरचे अध्यक्ष डॉ.प्रशांत जगताप यांनी लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छ भेटी दरम्यान सांगितले.

जगताप म्हणाले, सध्या उन्हाळी क्रीडा शिबीर सुरु आहेत. शिस्त लागावी म्हणून मुलांनी शिबिरात जाणे गरजेचं आहे. शिवाय प्रशिक्षक चांगला असल्यास त्याचा सकारात्मक फायदा मुलांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी होतो.  मात्र क्रीडा प्रकारातील दुखापती काय असतात, त्या कशामुळे होतात, त्या कशा होतात याची माहिती खेळाडूंना असणे आवश्यक आहे. दुखापत झाल्यास प्राथमिक उपचार  काय करायला हवे हे देखील खेळाडूंनी समजवून घेणे आवश्यक आहे. दुखापत झाल्यास  खेळाडूला आराम आवश्यक असून नेमक्या दुखापतीवर उपचार आवश्यक असतो. उपचार टाळल्यास भविष्यात तिच दुखापत अडचण ठरु शकते. खेळाकरिता थेट मदानात उतरण्यापूर्वी हलका व्यायाम (वार्मअप) करणे कधीही चांगले. कारण मास -पेशींचे दोन विशेष गुण असतात त्या म्हणजे लवचीकता आणि क्षमता या दोन्हीला संतुलीत ठेवाणे आवश्यक असते. मात्र याबद्दल खेळाडूंना माहिती नसल्याने त्यांनी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. विशिष्ट खेळात खेळाडूंच्या मास-पेशींच्या दुखापती सारख्याच आढळतात. त्या ओळखून त्याची शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने त्याबद्दलचे प्रशिक्षण घेणे आवश्यक असते.  लहानमुलांच्या दुखापत भविष्यात लक्षात येतात याचे कारण म्हणजे त्यावेळी केलेले दुर्लक्ष. लहान मुलांचे शरीर वाढणारे असते. या वयात जर मुलांना जबरमार बसला तर त्याची वाढ थांबू शकते आणि त्याचे दुष्परीणाम भविष्यात दिसून येतात. पूर्वीच्या तुलनेत सध्या क्रीडा दुखापतींवर अत्याधुनिक प्रकारे शस्त्रक्रियाच्या पद्धती आल्या असून डे केअर शस्त्रक्रिया ही नवी पद्धत आहे. शिवाय आजकाल दुर्बीणव्दारे शस्त्रक्रिया केल्या जातात.बऱ्याच दुखापती या फिजिओथेरपीने दुरुस्त होऊ शकतात. खेळा दरम्यान दुखापत झाल्यास प्रथमोपचार म्हणून बर्फाने शेकणे उत्तम असल्याचेही जगताप यांनी सांगितले.

खेळाडूंच्या तीव्र दुखापतीत वाढ

व्यवसायिक खेळाडूंचा कार्यकाळ कमी असतो. त्यामुळे कमी वेळेत जास्त सामने खेळावे लागतात.े स्वत:च्य शरीराकडे दुर्लक्ष होते. अशात त्यांच्यात तीव्र दुखापती (क्रॉनिक इंज्युरी)जास्त प्रमाणात आढळतात. या खेळाडूंना गुडघ्याच्या दुखापती होण्याची दाट शक्यता असते.

कॉन्टॅक्ट स्पोर्ट्समध्ये दुखात जास्त होतात

खेळताना  एका खेळाडूचा दुसऱ्याशी संपर्क येणे हा कॉनटॅक्ट स्पोर्ट्सचा प्रकार आहे. कबड्डी,खो-खो,हॉकी,फुटबॉल,रग्बी या खेळात खेळडूं थेट समरोरा-समोर धडकतात. या प्रकारात खाद्यांच्या आणि गुडघ्याच्या दुखापतीचे प्रमाणे जास्त आहे. त्यामुळे या खेळातील खेळडूंनी दुखापती बद्दल काळजी घेणे आवश्यक असते.

First Published on April 14, 2018 2:01 am

Web Title: players should not ignore injuries dr prashant jagtap