चंद्रशेखर बोबडे

बंजारा तांडय़ावरील स्मार्ट फोन नसलेल्या गरीब विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षणासाठी शेजारी किंवा परिसरातील परिचितांच्या स्मार्ट फोनचा नंबर शाळांना दिला खरा, पण परिचितांनी काही दिवसांनंतर परस्पर फोन बंद केल्याने या मुलांच्या शिक्षणाचा पेच निर्माण झाला आहे. ऑनलाइनसाठी आवश्यक सुविधा नसल्याने या मुलांची शाळा व अभ्यासाची नाळ तुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

राज्यात एकूण १५ जिल्ह्य़ात बंजारा समाजाचे वास्तव्य असून हा समाज आर्थिक आणि शैक्षणिकदृष्टय़ा मागासलेला आहे. बंजाराबहुल लोकसंख्या असलेल्या भागात त्यांच्यासाठी आश्रमशाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्या-त्या भागातील तांडय़ावरील (वस्ती) मुले सरकारी, जि.प. किंवा आश्रमशाळेत शिक्षण घेतात.

यंदा करोनाची साथ असल्याने शाळा बंद आहेत. अलीकडे शासनाने ऑनलाइन शाळा सुरू केल्या. मात्र ग्रामीण भागात यासाठी सुविधा नाहीत. या संदर्भात नेमकी काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी विदर्भातील यवतमाळ, वाशीम आणि अमरावती जिल्ह्य़ातील काही आश्रमशाळेच्या शिक्षकांशी संपर्क साधला असता हे चित्र पुढे आले.

अमरावती जिल्ह्य़ातील शिक्षक जितेश जाधव पहिली ते सातवीला शिकवतात. ते म्हणाले, ऑनलाइन शाळा सुरू करण्याचे आदेश आल्यावर आम्ही मुलांना स्मार्ट फोन घेण्यास सांगितले.

बहुतांश मुलांच्या घरी एकच स्मार्ट फोन होता. ज्यांच्याकडे स्मार्ट फोन नाही, त्यापैकी काही मुलांनी शेजारच्यांचा किंवा परिचितांशी बोलून त्यांचा क्रमांक शाळेला दिला. आम्ही त्यावर अभ्यासाचे व्हिडीओ, गृहपाठ पाठवत होतो; पण कालांतराने विद्यार्थ्यांच्या परिचितांनी फोन बंद केले.त्यामुळे विद्यार्थ्यांशी संपर्क तुटला. शाळेत एका वर्गात ३६ ते ४० मुले आहेत; पण १० ते १५ मुलांकडे स्मार्ट फोन असल्याने त्यांनाच शिकवतो.

यवतमाळ जिल्ह्य़ातील दिग्रस तालुक्यातील मुख्याध्यापक पी.जी. राठोड म्हणाले, मुलांचे पालक स्मार्ट फोन घेऊ शकत नाहीत.  आम्ही पाठवलेला अभ्यासक्रम मुलांपर्यंत पोहोचत नाही.

दिग्रस तालुका बंजारा समाज बहुल आहे. येथील ९० टक्के आश्रमशाळेत तांडय़ावरील मुले शिकतात हे येथे उल्लेखनीय. तांडय़ावरील मुलांच्या शिक्षणासाठी काम करणारे जाधव म्हणाले. सर्वात जास्त नुकसान दहावीच्या मुलांचे होत आहे. याबाबत राज्यमंत्री बच्चू कडू यांना निवेदन दिले आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

१५ हून अधिक जिल्ह्य़ात वास्तव्य

बंजारा समाज राज्यातील १५ हून अधिक जिल्ह्य़ात आहे. यात मराठवाडय़ातील ८, विदर्भातील चार आणि खान्देशातील ३ जिल्ह्य़ांचा समावेश आहे. संपूर्ण राज्यात तांडय़ांची संख्या १५ हजारांहून अधिक आहे. विदर्भात यवतमाळ, वाशीम आणि अकोला जिल्ह्य़ात याचे प्रमाण अधिक आहे.

बंजारा समाजात गरिबी मोठय़ा प्रमाणात आहे. एका तांडय़ावर १०० घरे असतील तर त्यापैकी केवळ १० घरांची परिस्थिती मुलांना स्मार्ट फोन घेऊन देण्यासारखी असते. इतर कुटुंबे मजुरी करतात. अशा स्थितीत ऑनलाइन शिक्षण घेणार तरी कसे?

– हरिभाऊ राठोड, माजी खासदार व बंजारा समाजाचे नेते