सुरक्षेत २२०० पोलिसांचा ताफा; मार्गावर ‘ड्रोन’ची नजर

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, १४ एप्रिलला नागपुरात येत असून त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. विमानतळापासून ते कोराडी येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रापर्यंत एकूण २ हजार २०० पोलीस अधिकारी व कर्मचारी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतील. याशिवाय पंतप्रधानांच्या मार्गावरील सुरक्षेवर नजर ठेवण्यासाठी ‘ड्रोन’चाही वापर करण्यात येणार आहे.

पंतप्रधान दौऱ्याच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पंतप्रधानांचे सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होईल.

त्यानंतर मोटारीने पुढचा प्रवास करतील. त्याच्या प्रवासाच्या मार्गावरील धरमपेठ, जपानी गार्डन आणि राजभवन हा मार्ग ‘नो पार्किंग’ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांची वाहतूक वळविण्यात आली असून नागरिकांनी शक्यतोवर पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

पंतप्रधानांच्या सुरक्षेत एसपीजी, बीडीडीएस, एसआरपीएफ, आरसीपी यांच्या वेगवेगळया बटालियन तैनात असतील. याशिवाय उपआयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक यांच्यासह जवळपास २ हजार २०० सैनिकांचा सुरक्षा पाहारा असेल. मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या कार्यक्रमाकरिता नागरिकांनी ११ वाजेपर्यंत प्रवेश मिळवावा. क्रीडा संकुलापासून वाहनतळाची व्यवस्था दूर करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

दीक्षाभूमीला पंतप्रधान भेट देणार असल्याने शततारका अपार्टमेंट- माताकचेरी- श्रद्धानंदपेठ, सावरकरनगर- लक्ष्मीनगर, बजाजनगर- शंकरनगर या मार्गाची वाहतूक वळविण्यात आली आहे. तर कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या कार्यक्रमासाठी दहेगाव- ड्रॅगन पॅलेस- कामठी रोड आणि दहेगाव ते नागपूर शहरात येणाऱ्या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. यातून कोराडी येथील रहिवाशांना वगळण्यात आले आहे.

विदर्भवादी, युवक काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर भेटीत विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि काँग्रेसशी संबंधित युवा संघटना निदर्शने करणार आहेत. मोदी यांनी स्वतंत्र विदर्भाची घोषणा करून वैदर्भीयांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा, तसे न केल्यास त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला जाईल. काँग्रेसच्या युवक संघटना मोदी यांच्या निषेधार्थ काळे फुगे आकाशात सोडणार आहेत. भाजपने १९९७ मध्ये भुवनेश्वर येथील कार्यकारिणीच्या बैठकीत स्वतंत्र विदर्भाचा ठराव केला होता. तसेच निवडणुकीच्यावेळी स्वतंत्र विदर्भ राज्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र केंद्रात व राज्यात सत्ता आल्यावर स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याची भाषा विसरले आहे. मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणाच्या निषेधार्थ काही युवक संघटना काळे फुगे आकाशात सोडणार असल्याचे सांगण्यात आहे. दरम्यान, नगरसेवक बंटी कुकडे यांनी ओसीडब्ल्यू, कनक सिर्सोस आणि एसएनडीएलच्या विरोधात दंड थोपाटले आहे. मोदी हे शहरात येत असल्याचे निमित्त साधून महालातील गांधी गेटजवळ ते उपोषणाला बसत आहेत.

निमंत्रण पत्रिकेवरकलर कोड

क्रीडा संकुलात प्रवेश करण्यासाठी नागरिकांनी निमंत्रण पत्रिकेसोबत सरकारी ओळखपत्र सोबत बाळगावे. निमंत्रण पत्रिकेवर चार प्रकारचे कलर कोड असून त्यानुसारच संकुलात प्रवेश व्यवस्था करण्यात आली आहे. संकुलाची क्षमता ३ हजार २०० लोकांची असून ती पूर्ण झाल्यावर दार बंद करण्यात येतील. परिसरात मंडप टाकण्यात आले असून त्या ठिकाणी मोठय़ा पडद्यावर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

बुद्धिस्ट सर्किटला बगल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यातून जिल्ह्य़ाच्या पर्यटन विकासात मैलाचा दगड ठरू शकणाऱ्या ‘बुद्धिस्ट सर्किट’ योजनेच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला बगल देण्यात आली आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षांचा समारोप उद्या, दीक्षाभूमी येथे होते आहे. त्यानिमित्त शहरातील दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस आणि चिचोली या तीन स्थळांना जोडणाऱ्या ‘बुद्धिस्ट सर्किट’ या योजनेचे भूमिपूजन केले जाणार होते. परंतु कार्यक्रम पत्रिकेत याचा उल्लेख नाही.

भारत सरकारच्या स्वदेश दर्शन बुद्धिस्ट सर्किट अंर्तगत या तीन पर्यटन स्थळाचा विकास करण्याचे नियोजन आहे. नागपूर सुधार प्रन्यासने ९९ कोटी ९१ लाख रुपयांचा सुधारित प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती दिनी बुद्धिस्ट सर्किटचे भूमिपूजन होत असल्याचे अधिकारी आणि भाजपचे पदाधिकारी यांच्याकडून सांगण्यात येत होते. नीती आयोगाच्या मानकापूर येथील कार्यक्रमात हा कार्यक्रम समाविष्ट होता. पण कार्यक्रम पत्रिकेत त्याचा उल्लेख नाही. दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस आणि चिचोली हे तीनही स्थळ बौद्ध धम्म आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी संबंधित आहेत. दीक्षाभूमी हे देशातील बौद्ध धम्माचे एक प्रमुख केंद्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे १४ ऑक्टोबर १९५६ ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. राज्य सरकारने दीभाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा प्रदान केला आहे. कामठी येथील ड्रॅगन पॅलेस हे प्रमुख बुद्धिस्ट केंद्र आहे. चिचोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वस्तूंचे संग्रहालय आहे.