शफी पठाण

प्राचीन मराठी कवितेच्या पारंपरिक चौकटीला तडे देत आधुनिक मराठी कविता बाळसे धरत असतानाच कवी अनिलांनी जन्म घेतला. हा मोठाच दैवी योग असेल कदाचित! तसे नसते तर मराठी कवितेच्या भरजरी सौंदर्यात मुक्तछंदाचा नवा अलंकार अन् ‘दशपदी’ची अपारंपरिक भेट नेमकी कवी अनिलांडूनच कशी दिली जाऊ शकली असती? पुढे ही कविता जशी ‘तरुण’ होत गेली तसेच कवी अनिलही तिच्याच समांतर तरुण झाले अन् एक दिवस त्यांच्याही कवितेची ‘फूलवात’ उजळलीच. तिच्या तशा या उजळण्याला नुकत्याच उलटलेल्या डिसेंबरमध्ये  तब्बल शंभर वष्रे पूर्ण झाली. पण, ना कवी अनिलांच्या नागपुरात, ना त्यांनी मुक्तछंद दिलेल्या एकूणच साहित्य विश्वात कुणाला ‘फूलवात’ची आठवण झाली.

कवी अनिल अर्थात आत्माराम रावजी देशपांडे. मूळचे नागपूरचे. अस्सल धंतोलीकर. ग्रेस आणि भटांच्या अगदी मधोमध वस्ती वसवून बसलेले. पण, लेखणीचा पिंड या दोघांपेक्षाही अगदी वेगळा. जास्त प्राचीन. १९ व्या शतकाचे तिसरे दशक. रविकिरण मंडळातील कवींचा बोलबाला असलेला हा काळ. कवितेचे यशापयश पांडित्यपूर्ण, संस्कृतप्रचुर शब्दकळा, प्रसंगोपातता, शब्दालंकार, यमकाच्या फूटपट्टीवर तपासल्यानंतरच ठरवायचा तो काळ. याच काळात ‘फूलवात’ आला. वर्ष होते १९३२. मनातल्या भावनांना शब्दांच्या अलवार कप्प्यात बसवून अनिलांनी ही ‘फूलवात’ फुलवली. त्यानंतर तब्बल १५ वर्षांनी ‘पेर्तेव्हा’ आला. पाठोपाठ ‘सांगाती’, ‘दशपदी’. त्याही पुढे खंडकाव्य, दीर्घकाव्यांनी मराठी कवितेला व एकूणच साहित्यविश्वाला अनिलांच्या लेखणीने समृद्ध केले. अनिल आणि कुसुमावती यांच्यातील पत्रव्यवहाराचा संग्रह अर्थात कुसुमानील तर या प्रवासातील एक मैलाचा दगडच. २७ डिसेंबर १९२० ला त्यांनी पहिली कविता लिहिली होती. त्याला नुकत्याच उलटलेल्या डिसेंबरमध्ये शंभर वष्रे पूर्ण झालीत. सलग ६१ वष्रे म्हणजे तब्बल पाच तप कवी अनिलांनी साहित्याची पूजा बांधली. पण, दुर्दैव असे की ज्या नागपुरातून कवी अनिल सर्वदूर पोहोचले त्या नागपूर शहरालाही याचे विस्मरण झाले. विशेष म्हणजे, १९६२ ते १९६५ आणि १९७४ ते १९७७ असे दोनदा अनिलांनी ज्या विदर्भ साहित्य संघाचे नेतृत्व केले. त्या वैदर्भीय साहित्य विश्वाची पालक संस्था वैगेरे असल्याचा दावा करणाऱ्या विदर्भ साहित्य संघालाही अनिल आठवल्याचे दिसले नाही. प्रत्यक्ष मायभूमीतच कवी अनिलांच्या वाटय़ाला ही उपेक्षा आल्यावर इतर प्रांतांकडून काय अपेक्षा करणार?

सुखावणारा योगायोग

उपेक्षेच्या या सावटातही एक मात्र चांगले घडले आहे. अनिलांची कविता आपल्या शतकी वळणावर पोहोचत असतानाच श्याम माधव धोंड यांच्या अभ्यासपूर्ण संपादनात तब्बल ६८६ पानांचा ‘कवी अनिल यांची संपूर्ण कविता’ हा संदर्भग्रंथ आकारास आला आहे. कवी अनिल अभ्यासताना कुणालाही हा ग्रंथ ओलांडून पुढे जाताच येणार नाही, इतका तो ‘उपयुक्त’ झाला आहे. म्हणूनच असेल कदचित विदर्भ साहित्य संघाने सलग दोन वर्षे वेगवेगळ्या गटात या ग्रंथाला गौरवले. गेल्यावर्षी उत्कृष्ट मुखपृष्ठ-मांडणीचा तर यंदा उत्कृष्ट संपादनाचा पुरस्कार या ग्रंथाच्या वाटयाला आला आहे. कवी अनिलांच्या ‘फूलवात’चा ‘सांगाती’ ठरेल इतकी क्षमता या ग्रंथात नक्कीच आहे. म्हणूनच, उद्या या ग्रंथाला मिळणाऱ्या पुरस्काराचे स्वागत अन् अभिनंदनही!