कवयित्री अरुणा ढेरे यांची काव्यविश्वाला साद; वेब व्याख्यानमालेचा समारोप

नागपूर : कधीकाळी कवीला कविर्मनिषी असे संबोधले जायचे. कारण, कवी हा ऋषीसारखा आहे. तो संभ्रमाच्या स्थितीत मार्गदर्शन करू शकतो. सभोवताल चौफेर अंधारात असताना जगाला एक नवीन प्रकाशवाट देऊ शकतो, असा विश्वास होता माणसांना. आज भयाची छाया दाहीदिशातून डोकावत असताना याच ऋषीच्या अर्थात कवीच्या कवितांनी पुन्हा एकदा दिशादर्शक  होण्याची गरज आहे. त्यासाठी लिहित्या हातांनी पूर्ण क्षमतेनिशी आपल्या लेखणीला बळ द्यायला हवे, अशा शब्दांत ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे यांनी काव्यविश्वाला साद घातली.

महाराष्ट्र राज्याच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित ‘गाथा महाराष्ट्राची’ या वेब व्याख्यानमालेच्या समारोपावेळी त्या बोलत होत्या. ‘मराठी कवितेची परंपरा’ या विषयावर त्यांनी शेवटचे पुष्प गुंफले. त्यात त्यांनी दीड-दोन हजार वर्षांपूर्वी लोकवाङ्मयाच्या मुळाशी रुजलेल्या कवितेच्या इवल्याशा बीजापासून आज एकविसाव्या शतकात फुलारलेल्या कवितेच्या वटवृक्षापर्यंतचा प्रवास ओझरत्या वाणीने विशद केला. एका विशिष्ट आकृतिबंधाचे रूप घेऊन मराठी कविता पहिल्यांदा जगासमोर कधी आली हे सांगताना अरुणा ढेरे यांनी श्रोत्यांना सातवाहन काळापर्यंत मागे नेले. तत्कालीन राजाने त्याच्या प्रजेचे लोकजीवन आपल्या काव्यातून मांडणाऱ्या कवींचे अनुभव ‘सप्तसयी’ या प्राकृतातील गाथेत पहिल्यांदा शब्दबद्ध केले. तिथून खऱ्या अर्थाने हा वैभवशाली काव्यप्रवास सुरू झाला. अर्थात हे काव्य संस्कृतात असल्याने तेव्हा ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे होते. पुढे संत आणि पंत अर्थात संतकाव्य आणि पंडितकाव्य पर्वापर्यंत यात फारसा बदल झाला नाही; परंतु मध्ययुगात तंत अर्थात शाहिरी काव्याचे एक नवे विस्मयकारी युग अवतरले आणि कविता घराघरांत पोहोचायला लागली. प्रभाकर, पठ्ठे बापूराव, राम जोशी, होनाजी बाळा, यांची शृंगार पेरणारी लावणी आणि वामनदादा कर्डक, अमर शेख यांचे विद्रोहाचा अंगार मनमेंदूत भिनवणारे पोवाडे, असे विलक्षण विसंगत काव्य एकाच वेळेस शाहिरी काव्यात निनादत होते. गोवामुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन या शाहिरी काव्याने गाजवले. अशा या प्राचीन रंगातील कवितेने पहिल्यांदा कात कशी टाकली हे सांगताना अरुणा ढेरे म्हणाल्या, इंग्रज भारतात आले आणि मराठी कविताही बदलली. या नवीन स्थित्यंतराचे अग्रदूत ठरले ते केशवसुत. त्यांनी कवितेला आकाशाची वीज संबोधून तिचे महत्त्व अधोरेखित केले. त्यानंतर आलेल्या आरती प्रभूंनी केशवसुतांइतक्याच गांभीर्याने कवितेला पुढे नेले. त्यानंतरच्या बालकवी तांबे यांनी तर कवितेला निरागस, कोवळेपणाचे नवीन कोंदण मिळवून दिले. प्रेमातले दु:ख काव्यातून पहिल्यांदा समोर मांडणारे गोविंदाग्रज असोत की स्त्री-पुरुषातला विराग -अनुराग एकत्र शब्दबद्ध करणारे बा. भ. बोरकर यांच्या कवितांनी मराठी काव्यविश्वाला एक अतिशय नवी अन् धाडसी वाट दाखवली, याकडे ही अरुणा ढेरे यांनी आवर्जून लक्ष वेधले. एकएकट्याने कविता गाजवण्याच्या या काळात अचानक समूहाचे नाव कसे गाजायला लागले हे सांगताना अरुणा ढेरे यांनी रविकिरण मंडळाची जन्मकथा सांगितली. पुण्यात चहाच्या निमित्ताने एकत्र येणारे माधव जूलियन, रानडे, गिरीश, यशवंत यांनी काव्यगायनाचे प्रयोग करून कविता लोकप्रिय केली. यानंतर मराठी कवितेत पुन्हा एकदा मोठे स्थित्यंतर झाले ते मर्ढेकरांच्या रूपाने. मराठी कवितेला तरल स्वप्नांच्या परिघाबाहेर काढून ‘पंक्चरली जरी रात्र दिव्यांनी…’ अशा शब्दांत महानगरांचा जीवघेणा उदयकाळ, यंत्रयुगामुळे सुरू झालेले शोषणपर्व मर्ढेकरांनी आपल्या कवितेतून चितारल्याचे अरुणा ढेरे यांनी सांगितले. कवीइतकेच कवयित्रींनीही मराठी कवितेचा हा प्रवास कसा समृद्ध केला हे सांगताना त्यांनी बहिणाबाई, इंदिरा संत यांच्यापासून तर अगदी नीरजा यांच्या कवितांचे दाखले दिले. १९६० ते १९९० च्या काळात आंबेडकरवादी कवितांनी आपल्या हक्काचा आवाज बुलंद केला. परिवर्तनाचा हा शंखनाद मराठी कविता पहिल्यांदाच ऐकत होती. अनेक कवी या परिवर्तनाच्या पालखीचे भोई झाले. व्यवस्थेविरुद्धच्या विद्रोहाला शब्दांचा आवाज मिळाला. अशा वळणावळणांनी ही कविता मुक्तिबोध, रेगेंपर्यंत पोहोचली. कवी अनिल, विंदा यांच्या कवितेने वैश्विकतेचे भान दिले. आचार्य अत्रे, मंगेश पाडगावकर यांच्या विडंबन गीतांनीही वाचकांना वेड लावले. गदिमा, पु. ल. देशपांडे यांच्या रचनांनी चित्रपटसृष्टीसाठी कवितेचे दार मोकळे करून दिले. रोहिनी भाटे, शमा भाटे यांनी तर नृत्यातून काव्य फुलवले. प्रत्येकाच्या लेखणीचे एक वेगळे कौशल्य होते. या क्रमातील ग्रेसांची कविता तर जणू एक वेगळेच बेट होते. जुन्या मात्रा वृत्तांना त्यांनी जणू नवीन जन्म दिला. ग्रेसांच्याच नागपूरचे दुसरे कवी सुरेश भट यांच्या मराठी गझलेने स्वत:चा असा वेगळा संप्रदाय निर्माण केल्याचे सांगत अरुणा ढेरे यांनी मराठी कवितेच्या परंपरेचा विशाल पट श्रोत्यांसमोर मांडला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम यांनी, तर सूत्रसंचालन भक्ती बिसुरे यांनी केले.

प्रस्तुती : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)

सहप्रायोजक : सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि. आणि मे. बी. जी. चितळे डेअरी

पॉवर्ड बाय : मांडके हिर्अंरग

सर्व्हिसेस, पुणे</strong>