एका रात्रीतच संपूर्ण कुटुंबाचा घात; खुनाच्या आरोपातून सुटका करवणाऱ्यांनाच संपवले

कमलाकरची मुलगी मिताली व आरोपी विवेकची मुलगी वैष्णवी या मीराबाई यांच्यासह बैठक खोलीत झोपलेल्या होत्या. आरोपीही त्याच खोलीत झोपला असावा, असा संशय पोलीस व्यक्त करीत आहेत, तर कमलाकर, अर्चना, वेदांती आणि कृष्णा हे एका खोलीत झोपले होते. विवेकने रात्री १ ते ३ दरम्यान कमलाकर यांच्या शयनकक्षात गेला व त्याने सब्बलने त्यांच्या डोक्यावर वार केले  असावे. त्यानंतर एकेकाचे डोके पूर्णपणे ठेचून काढले. दरम्यान, कमलाकरची आई मीराबाई यांना आवाज आल्याने त्या मुलाच्या खोलीकडे गेल्या असता त्याने त्यांनाही  ठार मारले. त्यानंतर तो पळून गेला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बैठक खोलीत झोपलेल्या दोन्ही मुली बचावल्या. श्वानपथकाच्या माध्यमातून घराच्या सुरक्षा भिंतीच्या बाजूला सब्बल सापडली. अशी प्रतिक्रिय अतिरिक्त पोलीस आयुक्त श्यामराव दिघावकर, उपायुक्त नीलेश भरणे व संभाजी कदम यांनी व्यक्त केली.

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून करून तिला जाळण्याच्या प्रकरणातून निर्दोष सुटका करवणारी बहीण व जावयासह भाची, जावयाची आई व स्वत:च्या मुलाला क्रूरकर्मा विवेक गुलाबराव पालटकर याने संपवले. ही खळबळजनक घटना सोमवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आराधनानगर परिसरात उघडकीस आली.

कमलाकर पवनकर, अर्चना पवनकर, वेदांती पवनकर, मीराबाई पवनकर आणि कृष्णा पालटकर अशी मृतांची नावे आहेत. विवेक आणि अर्चना हे भाऊ बहीण होत. त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला असून आई नवरगाव येथे राहते. त्यांना दहा एकर शेती आहे. विवेक हा पत्नी व दोन मुलांसह गावातच राहायचा. मात्र, तो नेहमी पत्नी सविताच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यावरून दोघांमध्ये नेहमी खटके उडायचे. यातून २३ मे २०१५ ला सकाळी ९ वाजताच्या सुमारास पत्नीचा लाकडी दांडय़ाने मारून खून केला व तिचा मृतदेह एका शेतात नेऊन जाळला. त्यानंतर त्याने २५ मे रोजी कमलाकर यांना भ्रमणध्वनी करून आपली बायको दोन मुले व आपल्याला सोडून निघून गेल्याची माहिती दिली. त्याच दिवशी तो दोन मुलांसह कमलाकरच्या घरी पोहोचला.

दरम्यान, ३० मे २०१५ ला मृतदेहाचा सांगाडा जळालेल्या अवस्थेत एका शेतकऱ्याला दिसला. त्याने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर मौदा तालुक्यातील आरोली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तपास केला. त्यावेळी डीएनए चाचणीवरून ती त्याची पत्नी सविता असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने आपणच तिचा खून केल्याचे कबूल केले होते. या प्रकरणाचा खटला सत्र न्यायालयात चालला.  आरोपीच्या बचावाकरिता कलमाकर व त्याची बहीण अर्चना यांनी वकील केले. सत्र न्यायालयाने ३० नोव्हेंबर २०१५ ला त्याला पत्नीच्या  खुनाच्या   आरोपात जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्याविरुद्ध त्याची बहीण व जावयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, त्याच्या जामिनासाठीही प्रयत्न करण्यात आले. मात्र, जामीन मिळाला नाही. त्याच्या अपिलावर न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. सर्व पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने १७ एप्रिल २०१७ ला सबळ पुराव्याअभावी त्याची निर्दोष सुटका केली. त्यानंतर तो कारागृहाबाहेर आला. त्याची कारागृहातून सुटका करण्यासाठी त्याची बहीण व जावयाने लाखो रुपये खर्च केले.

कारागृहातून बाहेर आल्यानंतर तो गावी गेला. त्याने गावातील दहा एकर शेती मक्त्याने  दिली. त्यानंतर तो पूर्वी अमरावती मार्गावर खोली करून राहू लागला. त्याने मुलगा कृष्णा व मुलगी वैष्णवी यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते त्याच्यासोबत गेले नाही. त्यामुळे त्याने कमलाकर यांच्या घराच्या परिसरातच एक खोली भाडय़ाने घेतली. यानंतर तो नेहमी बहिणीच्या घरी येत होता. दिवसभर दुकानही सांभाळायचा.

दरम्यान, कमलाकरची आई मीराबाईला तो आवडत नव्हता. त्यामुळे त्या त्याला टाकून बोलायच्या, तर अर्चनाचेही तिच्या सासूसोबत खटके उडायचे. दरम्यान, कमलाकर व अर्चनाने त्याला त्याच्या न्यायालयीन प्रक्रियेवर खर्च झालेले पैसे मागण्यास सुरुवात केली.

त्यावेळी तो पैसे परत करण्याची ग्वाही देत होता. मात्र, शेती मक्त्याने देऊन लाखो रुपयांचे कर्ज कसे फेडणार, असा सवाल करून त्याला काही शेती विकण्यास सांगितले. तेव्हापासून तो तणावात होता. त्याशिवाय मुले आपल्यासोबत येत नसून बहीण व जावई हे आपल्या मुलांच्या माध्यमातून  शेती हडपण्याच्या प्रयत्नात असल्याचा त्याचा संशय झाला. या संशयातून त्याने कमलाकर यांचे संपूर्ण कुटुंब संपवण्याचा निर्णय घेतला.

मितालीच्या अंगावरही रक्त

सकाळी ७ वाजता मिताली व वैष्णवी यांना जाग आली. त्यावेळी मिताली नेहमीप्रमाणे आईकडे गेली असता स्वयंपाकगृहात आजी व घरातील पलंगावर सर्वजण रक्ताच्या थारोळयात पडलेले होते. तिने आईला उठवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आईचे रक्त तिच्या अंगाला लागले. कुणीच उठत नसल्याने ती धावत धावत वस्तीतच राहणारी मोठी आई लता पवनकर यांच्या घरी गेली. लता या तिला घेऊन त्यांच्या घरी आल्या तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यांनी शेजाऱ्यांना गोळा करून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर नंदनवन पोलीस ठाण्याचे कर्मचारी व इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अतिरिक्त पोलीस आयुक्त श्यामराव दिघावकर, परिमंडळ-४ चे उपायुक्त नीलेश भरणे, गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक आयुक्त डॉ. अश्विनी पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.

भाजपचे कार्यकर्ते, हळहळ

कमलाकर हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते. ते नेहमी लोकांच्या मदतीसाठी धावून जात होते. त्यांच्या मृत्यूची बातमी पसरताच परिसरातील स्थानिक नगरसेविका व इतर भाजप पदाधिकारी त्यांच्या घरी पोहोचले. सोमवारी दुपारी २ वाजेपर्यंत परिसरात लोकांनी एकच गर्दी केली होती.

स्वत:च्या मुलाप्रमाणे आरोपीच्या मुलांवर प्रेम

पत्नीच्या खुनात विवेक हा कारागृहात होता. त्यावेळी त्याची आई मनोरुग्ण असल्याने अर्चना व कमलाकर यांनी त्याच्या दोन्ही मुलांचा सांभाळ केला.  ते त्याचा लहान मुलगा कृष्णा त्यांच्यासोबत झोपायचा. तर त्याची मोठी मुलगी वैष्णवीच्या नावाने इलेक्ट्रिक सामानाचे दुकान टाकले होते. त्यामुळेच वडील कारागृहाबाहेर आल्यानंतरही ते त्याच्यासोबत जाण्यास तयार नव्हते.

प्रकरणाचा डिजिटल तपास

घटना घडल्यापासून पोलिसांनी प्रकरणाचा डिजिटल तपास करायला सुरुवात केली. पोलिसांनी घटनास्थळवरच संगणकीकृत प्रथम खबरी अहवाल (एफआयआर), घटनास्थळाचा पंचनाम्याचे व्हीडिओ, पुरावे जप्ती व पंचांचे जबाब नोंदवून घेतले. या प्रकरणात डिजिटल दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती भरणे यांनी दिली.

मिताली समजून कृष्णाचा खून

कृष्णा व मिताली हे एकाच वयाचे असून दोघांचेही चेहरे मिळतेजुळते आहेत. रात्रीच्या सुमारास कमलाकर व अर्चनाजवळ त्यांच्या दोन मुली झोपलेल्या होत्या. त्यामुळे त्याने स्वत:च्या मुलांना सोडून कमलाकरचे संपूर्ण कुटुंबच संपवण्याच्या दृष्टीने हे हत्याकांड केले. मात्र, मितालीऐवजी आरोपीचा मुलगा विवेक हा कमलाकरजवळ झोपला होता व त्याचाही मृत्यू झाला.