News Flash

पोलीस-नक्षलवादी संघर्षांत आदिवासींचीच गळचेपी

सध्या तेंदूपानांच्या तोडणीचा हंगाम सुरू असल्याने नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमध्ये कमालीची वाढ झाली आहे.

तेंदूपानांची तोडणी बंद; मजुरीही नाही
पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये सुरू असलेल्या संघर्षांत सामान्य आदिवासीच भरडले जात असल्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. नक्षलवाद्यांनी एका जवानाला ठार केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी गावकऱ्यांना मारहाण करून एका तरुणाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हा तरुण नक्षलवादी नाही, असा दावा गावकऱ्यांनी असून, पोलिसांनी मात्र कारवाई योग्य असल्याचे म्हटले आहे.
सध्या तेंदूपानांच्या तोडणीचा हंगाम सुरू असल्याने नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. दोन दिवसापूर्वी नक्षलवाद्यांनी कोठी पोलीस ठाण्यातील जवान बंडू वाचामीची हत्या केली. त्याला नक्षलवाद्यांच्या जाळ्यात अडकवण्यात निळगुळवंचा गावातील काही तरुणांचा हात आहे, अशी खबर मिळाल्याने पोलीस या गावात १६ मे रोजी गेले. या गावातील सर्व गावकऱ्यांना १७ मे रोजी भामरागड पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. चौकशीदरम्यान पोलिसांनी गावातील तरुणांना बेदम मारहाण केली. ‘नक्षलवाद्यांना जेवण दिले, त्यांच्यासोबत बैठक घेतली,’ असे आरोप गावकऱ्यांवर करण्यात आले. मारहाण झालेल्यांपैकी चुक्कू पुंगाटी या तरुणाची प्रकृती चिंताजनक असून, त्याला हेमलकसाच्या लोकबिरादरी प्रकल्पात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चुक्कू हा भामरागडच्या आश्रमशाळेत शिक्षण घेत असून, त्याचा नक्षलवाद्यांशी कोणताही संबंध नाही, असा दावा गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
निळगुळवंचा गावातीलच पेका पुंगाटी या युवकाला एका पोलिसाच्या हत्येच्या आरोपावरून अटक केली आहे. संबंधित जवानाला नक्षलवाद्यांनी सापळ्यात अडकवले, असा पोलिसांचा आरोप आहे. या जवानाचे अपहरण नक्षलवाद्यांनी पाच दिवस आधीच केले होते. पोलिसांनी अटक केलेल्या युवकाचा नक्षल चळवळीशी कोणताही संबंध नसून अपहरणाची घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी तो जंगलात तेंदूपाने तोडत होता. केवळ याच आधारावर त्याला खुनाच्या गुन्ह्य़ात अडकवण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

दहशतीचे वातावरण
निळगुळवंचा, नारगुंडा, कोठी परिसरात दहशतीचे वातावरण असून आदिवासींनी तेंदूपाने तोडण्यासाठी जंगलात जाणेच बंद केले आहे. ऐन हंगामात हा प्रकार घडल्याने आदिवासी मजुरीपासून वंचित आहेत. आता यात जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी निवेदनातून केली असून, भामरागडचे ठाणेदार चौधरी यांनी मारहाणीचे आरोप फेटाळून लावत झालेली कारवाई योग्य असल्याचे म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2016 1:31 am

Web Title: police and naxal conflicts in nagpur
टॅग : Naxal
Next Stories
1 आसामच्या विजयात संघाच्या मराठी प्रचारकांचा वाटा
2 मेट्रोमध्ये वायफाय अन् सीसीटीव्ही!
3 भारतात ‘आयबीडी’चे १२ लाख रुग्ण
Just Now!
X