25 November 2017

News Flash

गोमांस बाळगणाऱ्या सलीम शहाला अटक

अमरावती जिल्ह्य़ातील आमनेर येथून सलीम १२ जुलैला मांस घेवून एका धार्मिकस्थळी जात होता.

प्रतिनिधी, नागपूर | Updated: July 17, 2017 1:49 AM

न्यायालयाकडून एक दिवसाची पोलीस कोठडी

भाजपच्या अल्पसंख्यांक आघाडीचा माजी उपाध्यक्ष सलीम इस्माईल शहा (वय- ३२, रा. काटोल) यांच्याकडे सापडलेले मांस हे गोमांसच असल्याचे पुढे आल्यावर शनिवारी मध्यरात्री त्याला पोलिसांनी अटक केली आहे. शहा यांना नरखेडच्या न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान भाजपकडून सलीमची शनिवारी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.

अमरावती जिल्ह्य़ातील आमनेर येथून सलीम १२ जुलैला मांस घेवून एका धार्मिकस्थळी जात होता. त्यावेळी प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष मोरेश्वर तांदुळकर रा. भारसिंगी व इतर जगदीश रामचंद्र चौधरी रा. मदना, ता. नरखेड, अश्विन कृष्णराव उईके रा. भारसिंगी आणि रामेश्वर शेषराव तायवाडे रा. जामगाव यांनी त्याला बसस्थानकावर अडविले. त्यांच्या गाडीच्या डिक्कीत असलेले मांस हे गोमांस असल्याच्या संशयावरून तांदुळकर आणि इतरांनी त्यांना भर रस्त्यावर मारहाण केली होती.

समाजाच्या सगळ्याच स्तरावरून दबाव निर्माण झाल्यावर जलालखेडा पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून सगळ्यांना अटक केली. तसेच शहा यांच्याविरुद्ध प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. सलीमकडून जप्त करण्यात आलेले मांस हे परीक्षणासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविले. अहवालात ते गो- मांस असल्याचे शनिवारी पुढे आले. त्यावरून जलालखेडा पोलिसांनी आरोपी सलीम शहाला शनिवारच्या रात्रीच अटक केली. रविवारी त्याला नरखेडच्या जेएमएफसी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान सलीमची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यावर मेयोतही उपचार करण्यात आले होते.

First Published on July 17, 2017 1:49 am

Web Title: police arrest thrashed bjp worker salim shaha for carrying beef