अनेक पोलीस कर्मचाऱ्यांची घरे उद्ध्वस्त; वसाहत परिसरातील वास्तव

पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शेजार लाभल्यानंतर सर्वसामान्य नागरिक स्वत:ला अधिक सुरक्षित समजतो. वसाहत जर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची असेल तर आजूबाजूच्या एक किमी परिसरात कोणत्याही प्रकारचे गुन्हे घडणार नाही, असा विश्वास नागरिकांना असतो. मात्र, काटोल मार्गावरील पोलीस लाईन टाकळी परिसरातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची वसाहत गुन्हेगारीचा अड्डा झाली असून हा परिसर जुगार, सट्टा अशा अवैध धंद्याचे केंद्र ठरले आहे. या धद्यांमुळे अनेक पोलिसांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत.

पोलीस लाईन टाकळी परिसरात नागपूर शहर पोलिसांचे मुख्यालय, गुन्हे शाखेचे कार्यालय, वाहन प्रशिक्षण अधीक्षक (एमटी) कार्यालय आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांची जवळपास १ हजार ५०० पेक्षा अधिक घरे आहेत. परिसरात २४ तास खाकी ‘वर्दी’चा राबता असतो. असे असूनही या भागातील तलाव परिसरात मोठा जुगार अड्डा चालतो व विशेष म्हणजे, तो पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील  सदस्यच चालवतो. येथे जुगार खेळणारेही बहुतांश पोलीस कर्मचारीच असतात. ७ एप्रिल २०१७ ला पोलीस उपायुक्तांच्या आदेशानुसार पोलिसांनी जुगार अड्डय़ावर छापा टाकला होता. त्यात विद्यमान आणि माजी अशा चार पोलीस कर्मचाऱ्यांना जुगार खेळताना अटक करण्यात आली होती. त्यानंतरही पुन्हा त्याच ठिकाणी अड्डा पूर्ववत सुरू आहे. आठवडाभरापूर्वी राणाप्रतापनगर पोलिसांनी अटक केलेले सोनसाखळी चोरही याच परिसरात जुगार खेळायचे व त्याकरिता ते चोरी करीत असल्याची बाब तपासात उघड झाली.

याशिवाय परिसरात मोठय़ा प्रमाणात सट्टा खेळला जातो. यात मोठय़ा प्रमाणात पोलीस कर्मचारी, त्यांची मुले गुंतलेली आहेत. अनेक पोलीस कर्मचारी आपली वाहने तारण ठेवून सट्टा लावतात. अनेकांचा दरमहा वेतनाचा बहुतांश भाग सट्टय़ाची उधारी चुकती करण्यात जातो. पोलीस लाईन टाकळी आणि परिसरात जुगार अड्डे व सट्टा अड्डे चालत असताना त्यावर कोणतीच कारवाई होत नाही. त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होते.

या ठिकाणी चालतो सट्टा

सर्वाधिक पोलीस कर्मचारी व त्यांची मुले बंटीकडे सट्टा लावतात आणि तो गिट्टीखदान पोलीस ठाण्याला लागून असलेल्या खाण परिसरात सहा ते सात घरांमधून आपले काम करतो. मुन्ना बल्लारे हा टी.व्ही. टॉवर परिसरात सट्टा चालवतो. संतोष नावाचा सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतच सट्टा चालवत असल्याची माहिती आहे. याशिवाय गिन्नी नावाचा व्यक्ती जाफरनगर, दिनशॉ फॅक्टरी परिसर आणि नागपूर-नागरिक बँकेच्या विरुद्ध दिशेला बसून सट्टापट्टी घेतो, तर ठाकूर व निखार हे गिट्टीखदान ते वाडी मार्गावर मटका चालवतात. त्यांच्यावर स्थानिक पोलिसांची कृपादृष्टी असल्याचे सांगण्यात येते.

माहिती घेऊन कारवाई करू

अशाप्रकारचे कोणतेही प्रकार चालू दिले जाणार नाहीत. यात आजी-माजी पोलीस कर्मचारी  असले तरी त्यांची गय केली जाणार नाही. परिसरातील अवैध धंद्यांची माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल.

– चिन्मय पंडित, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-२