कौटुंबिक कलह, भांडण की वेगळेच काही?

नागपूर : पोलीस शिपाई व त्याचे कुटुंबीय झोपले असताना त्याच्या घराला आग लावून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक कलह, भांडण किंवा इतर कारणांमुळे हा हल्ला करण्यात आला, या अनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत.

ही थरारक घटना एसआरपीएफ कॅम्पजवळील ज्ञानदीप कॉलनीलगतच्या सप्तकनगर येथे मंगळवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने पोलिसांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून, पोलिसांचे कुटुंबीय दहशतीत आहे. राहुल चव्हाण हे पोलीस मुख्यालयात कार्यरत असून, सध्या ते वानाडोंगरीतील आयटीआय कोव्हिड सेंटर येथे तैनात आहेत. सोमवारी रात्री राहुल हे कोविड सेंटर येथे गेले. राहुल हे कोविड सेंटरवर गेल्यानंतर घरी त्यांच्या पत्नी पूनम, मोठा मुलगा राघव (६) लहान मुलगा केशव (३) हे घरी होते. पहाटे ३ वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपीने दरवाजाला बाहेरून कडी लावली. दरवाजा व घरावर रॉकेल टाकून आग लावली. घरात धूर झाल्याने पूनम यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्या जागी झाल्या. त्या घाबरल्या. सावधगिरी बाळगत त्यांनी दोन्ही मुलांना जागे केले. दोघांना स्नानगृहात नेले. त्यानंतर त्या स्वयंपाकघरात आल्या. स्वयंपाक घरातील साहित्यही जळत होते. पूनम यांनी लगेच राहुल व शेजारी राहणारे मामा नामदेव राठोड यांच्या मोबाईलवर संपर्क साधून घराला आग लावण्यात आल्याची माहिती दिली. पूनम यांनी आग विझवायला सुरुवात केली. याचदरम्यान त्यांचे मामा तेथे पोहोचले. त्यांनी शेजाऱ्यांना जागे केले. शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांनी आग विझवली. मामांनी दरवाजा तोडला. पूनम व त्यांच्या मुलांना घराबाहेर काढले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी पंचनामा केला. पूनम चव्हाण यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे, पण आरोपी अद्याप सापडले नसल्याने या घटनेमागचे कारण स्पष्ट झालेले नाही, अशी प्रतिक्रिया वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांनी  दिली. सर्व बाजूने तपास

राहुलने २०११ मध्ये पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतलेला आहे. त्यामुळे कौटुंबिक कलहामुळे ही घटना घडली का, याचा शोध पोलीस घेत आहेत. दुसरीकडे राहुलचा स्वभाव भांडखोर असून वस्तीत तो खाकी वर्दीचा धाक दाखवायचा. यातून अनेकांशी त्याचे मतभेद निर्माण झाले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रीकरण तपासले असता दोघेजण आग लावून पळून जाताना दिसत आहेत. रात्रीच्या अंधारात ते स्पष्टपणे दिसत नसल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.