News Flash

रतनसारखे अनेक ‘वसुली’ अधिकारी पोलीस दलात

गुन्हेगार, क्रिकेट बुकींसोबत संबंध असलेले अनेक अधिकारी नागपूर पोलीस दलात कार्यरत आहेत.

प्रतिनिधिक छायाचित्र

क्रिकेट बुकी, गुन्हेगारांशी ‘सोटेलोटे’

क्रिकेट बुकींबरोबरच्या संबंधामुळे पोलीस हवालदार रतन उंबरकर हा चांगलाच अडचणीत आला असून कोंढाळी पोलिसांनी त्याला क्रिकेट सट्टा प्रकरणात आरोपी केले आहे. मात्र, त्याच्यासारखे अनेक कर्मचारी पोलीस दलात आहेत ज्यांचे क्रिकेट बुकी आणि इतर गुन्हेगारांशी ‘साटेलोटे’ असून ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसाठी वसुलीचे काम करतात.

कोंढाळी पोलिसांनी १४ ऑगस्टला सातनवरी शिवारातील एका फार्महाऊसवरील क्रिकेट सट्टय़ावर छापा टाकून विलास भीमराव मनघटे (३६) रा. नंदनवन, दीपक शंकर गोस्वामी (२९) रा. हिवरेनगर, शेख अब्बास शेख हमीद (३३) रा. हिवरे लेआऊट आणि यश कन्हैयालाल अरोरा (२१) रा. लकडगंज यांना अटक केली होती. त्यांच्याकडून १४ मोबाईल, २ लॅपटॉप आणि एक मोटार असा एकूण ९ लाख २३ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल सापडला. आरोपींना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष हजर केले असता त्यांना १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. हे फार्महाऊस सुरेश कटामले रा. वाडी याने आरोपींना उपलब्ध करून दिले होते. या प्रकरणात कुख्यात क्रिकेट बुकी दीपेन भेदा, शेख फिरोज यांच्यासह रतन उंबरकर या पोलीस हवालदाराला आरोपी करण्यात आले. त्यासंदर्भात कोंढाळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार अहिरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रतनला आरोपी करण्यात आले असून त्याने अटकपूर्व जामीन अर्जासाठी धाव घेतली आहे. तो अर्ज निकाली निघाल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप निकालाची प्रत मिळाली नाही. त्यामुळे निकालाची प्रत मिळताच पुढील कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

गुन्हे परिमंडळातही अनेक कर्मचारी

गुन्हेगार, क्रिकेट बुकींसोबत संबंध असलेले अनेक अधिकारी नागपूर पोलीस दलात कार्यरत आहेत. गुन्हे शाखेच्या परिमंडळ पथकांमध्येही काही असे कर्मचारी आहेत. सध्या विशेष शाखेत कार्यरत हवालदार अन्नू असेच काम करतो. त्याचे तीन साथीदार गुन्हे शाखेच्या परिमंडळ-३ च्या पथकात आहेत. तर परिमंडळ-२ च्या पथकामध्ये बटुकलाल यांचा समावेश असून त्यांची तक्रार तर एका लॉटरीवाल्याने थेट पोलीस उपायुक्तांकडे  केली होती. त्याशिवाय धंतोलीतील शरद, पाचपावलीतील राजू, अंबाझरीतील दीपक आणि बजाजनगर येथील सचिन यांचीही नावे नागपूर शहर पोलीस दलात नेहमी चर्चेत असतात. या कर्मचाऱ्यांचे पद आणि त्यांच्या संपत्ती तपासल्यास, सर्व खरे-खोटे बाहेर येईल, अशी चर्चा पोलीस वर्तुळात सुरू असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2017 3:34 am

Web Title: police constable ratan umbarkar accused in cricket betting
Next Stories
1 दुर्घटनाग्रस्त दुरान्तोमधील प्रवाशांनी अनुभवला थरार
2 विघ्नहर्त्यांची कृपा म्हणून बचावलो!
3 शहरांतील दारू दुकानांबाबत सरकारची भूमिका काय?
Just Now!
X