14 December 2017

News Flash

पोलीस शिपायाकडून पत्नीची जाळून हत्या

वैशाली नागमोते असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे, तर देवेंद्र नागमोते असे आरोपीचे नाव

प्रतिनिधी, नागपूर | Updated: October 3, 2017 5:04 AM

प्रतिकात्मक छायाचित्र

मुलांमुळे आरोपीचा बनाव उघडकीस

पोलीस शिपायाने अत्यंत चलाखीने वकील पत्नीची जाळून हत्या केली आणि तिने घरघुती भांडणात जाळून घेतल्याचा बनाव केला. मात्र, त्यांच्या मुलांनीच या घटनेमागील सत्य पोलिसांना सांगितल्याने खरा प्रकार उघडकीस आला.

वैशाली नागमोते असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे, तर देवेंद्र नागमोते असे आरोपीचे नाव आहे. देवेंद्र हा पोलीस शिपाई आहे. २८ सप्टेंबरला वैशाली नागमोते त्यांच्या राहत्या घरी ९० टक्के भाजल्या होत्या. उपचारादरम्यान त्यांचा ३० सप्टेंबरला मृत्यू झाला. देवेंद्रने सर्वापुढे पत्नी वैशालीने स्वत: जाळून घेतले, असे सांगितले. तो स्वत: ४० टक्के भाजल्याने त्याचे म्हणणे त्यावेळी अनेकांना खरे वाटत होते. मात्र, वास्तविक स्थिती जाणण्यासाठी घटनेच्या वेळी घरी असलेल्या त्यांच्या सात आणि तीन वर्षीय चिमुकल्यांना पोलिसांनी विचारणा केली. त्यावेळी त्यांनी घडलेला सर्व प्रसंग सांगितला. तो ऐकून पोलीसही चकित झाले. या चिमुकल्यांमुळे देवेंद्रचा खरा चेहरा पुढे आला.

मुलांनी सांगितल्याप्रमाणेने देवेंद्र रोज मद्य प्राशन करून आईला (वैशाली) मारहाण करायचा. त्यादिवशी त्यांनीच आईच्या अंगावर रॉकेल टाकून जाळले. त्यानंतर त्यांनी आग विझवली व आईला रुग्णालयात नेले.

या माहितीनंतर पोलिसांनी आरोपी देवेंद्रच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपी देवेंद्र एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यामुळे त्याला रुग्णालयातून सुट्टी झाल्यावरच त्यावर पुढील कारवाईची शक्यता आहे.

First Published on October 3, 2017 5:04 am

Web Title: police constable sets wife on fire