लोकांकडून स्वागत, अनेकजण अडचणीत येणार

स्वमालकीचे घर प्रत्येकाचे स्वप्न असते, आयुष्यभराच्या कष्टाच्या मिळकतीतून ते उभे करण्याचा त्याचा प्रयत्न असतो, अशात त्याने घेतलेला भूखंड कोणी हडपल्यास जीवाचा तिळपापड होतो. असे अनेक भूमाफिया शहरात सक्रिय झाले होते. त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी मोहीम हाती घेतल्याने सर्वसामान्यांनी त्यांचे स्वागत केले. मात्र, काही राजकीय पुढाऱ्यांचेही यात हात गुंतलेले असल्याने त्यांनी कारवाई रोखण्यासाठी पोलिसांवरच दबाव वाढविला असल्याची माहिती आहे.

दिलीप ग्वालबंशी आणि त्याच्या कुटुंबीयांनी शहरातील अनेक वस्त्यांमधील भूखंड हडपले. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी १६ पेक्षा अधिक गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणांचा तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. या पथकाकडे आतापर्यंत दीड हजारांवर लोकांच्या तक्रारी आल्या असून शेकडो एकर शेती हडपण्याचे प्रकार समोर आले आहेत. प्रत्येक प्रकरणाचा तपास करून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. ग्वालबंशी आणि संबंधितांनी हडपलेल्या भूखंडाचा तपास करणाऱ्या एसआयटीचा व्याप वाढला आहे. प्रॉपर्टी सेलचेही काम एसआयटीसोबत जोडण्यात आले आहे. त्यामुळे शहराच्या इतर भागातही मोठय़ा प्रमाणात बनावट दस्तावेज तयार करणे, भूखंड बळकावणे आदी प्रकार घडले आहेत. यात प्रामुख्याने पश्चिम नागपूर, दक्षिण नागपूर आणि दक्षिण-पश्चिम नागपुरातील भागांचा समावेश आहे. भूखंड बळकावणाऱ्यांमध्ये काही पुढाऱ्यांचीही नावे समोर येत आहेत. यात नगरसवेक, माजी आमदार आदींचाही समावेश आहे. त्यामुळे अनेक पुढारी अडचणीत येणार आहेत. भूखंड माफियांच्या विरोधातील कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असताना राजकीय पुढारी मर्जीतील लोकांना वाचविण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकत आहेत, अशी माहिती आहे. मात्र, पोलिसांनी आपली कारवाई सुरूच ठेवावी, अशी मागणी भूखंडमाफिया पीडित जनआंदोलन समितीने पोलिसांना निवेदन देऊन केली आहे.

कारवाई सुरूच राहणार

भूखंड माफियाविरोधात कारवाई सुरूच राहील. या प्रकरणात कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांचा दबाव नाही. सर्व स्तरातून कारवाईला पाठिंबा मिळत असून गुन्हे शाखेच्या कार्यालयात तक्रारी स्वीकारण्यात येत आहेत. पुढाऱ्यांचा दबाव वाढत असल्याचे म्हणणे चुकीचे आहे.

– डॉ. के. व्यंकटेशम, पोलीस आयुक्त.