महिनाभरात ६७ महिलांनी लाभ घेतला

देवेश गोंडाणे, लोकसत्ता 

नागपूर :  रात्रीच्या वेळी घरी जाणाऱ्या महिलांसाठी सुरू केलेल्या ‘होम ड्राप’ योजनेचा महिनाभरात ६७ महिलांनी लाभ घेतला. अडचणीच्या काळात महिला पोलिसांनी केलेल्या मदतीबद्दल महिलांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना कृतज्ञता व्यक्त केली.

महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे वाढल्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी नागपूर पोलिसांनी पुढाकार घेऊन रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत ‘होम ड्राप’ उपक्रम राबवला जात आहे. त्याला शहरातील महिलांचा वाढीव प्रतिसाद मिळत असल्याचे पोलिसांना येत असलेल्या दूरध्वनीवरून दिसून येते.

निर्भया प्रकरण आणि हैदराबाद येथील सामूहिक बलात्कार तसेच हत्याकांडानंतर महिला सुरक्षेशी संबंधित ‘अ‍ॅप’चेही डाऊनलोडिंग लाखोंनी वाढले आहे. मात्र, स्थानिक पातळीवर महिलांसाठी सुरक्षा योजना नव्हती. मात्र, नागपूर पोलिसांनी ४ डिसेंबरपासून ‘होम ड्राप’ हा उपक्रम सुरू केला आहे. शहरातील कुठल्याही भागात रात्री ९ नंतर एकटय़ा महिलेला घरी जाण्यासाठी वाहतुकीचे साधन मिळत नसेल तर तिने पोलीस नियंत्रण कक्षातील संबंधित क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यायची आहे. एका महिन्यामध्ये ६७ महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून योजनेचे सर्वानी कौतुक केले आहे. लाभार्थी महिलांशी संपर्क साधला असता नागपूर पोलिसांचे हे पाऊल कौतुकास्पद आहे, अशा प्रतिक्रिया मिळत आहेत.

पोलिसांविषयीचा गैरसमज दूर 

पोलीस विभागाकडून मदतीची अपेक्षा नाही, असा समज आजवर माझा होता. मात्र, ‘होम ड्राप’ उपक्रमाचा मी जेव्हा लाभ घेतला तेव्हा पोलिसांविषयीची भीती आणि चुकीचा समज दोन्ही दूर झाला. मेडिकल चौक येथे मी कामावरून निघाल्यावर उभी होते. बराच वेळ होऊनही घरी जायला साधन मिळाले नाही. अशावेळी मी १०० क्रमांकावर फोन केला. त्यानंतर लगेच इमामवाडा ठाण्यातील महिला पोलिसांचे वाहन आले. त्यांनी मला माझ्या घरी सोडून दिले. घराच्या लोकांनाही खूप आनंद झाला, अशी माहिती कुसुम यांनी दिली.

दुसऱ्या मुलीसाठी फोन केल्यावरही मदत : किशोर गौर

माझ्या घरच्या काम करणाऱ्या महिलेने मला फोन करून मेडिकल चौक येथे एक मुलगी उभी असल्याची माहिती दिली. तिला घरी सोडायला कुणीच नसल्याचे माहिती होताच मी पोलिसात फोन केला. तेव्हा इमामवाडा पोलिसांनी त्या मुलीला घरी सोडून दिले. तसेच दुसऱ्या दिवशी माझ्या घरच्या काम करणाऱ्या महिलेला भेटून त्या मुलीला सुखरूप घरी सोडल्याची माहितीही दिली, असे किशोर गौर यांनी सांगितले.

कौतुकास्पद उपक्रम 

रात्री मी एका खासगी कार्यक्रमाला गेले होते. मला तेथे बराच उशीर झाला. त्यामुळे मी पोलिसांनी दिलेल्या मदत क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा मी यशवंत स्टेडियमजवळ उभी होते. मी माहिती देताच मला याच जागेवर उभे राहण्यास सांगितले व दुसऱ्याच क्षणाला महिला पोलिसांचे एक वाहन मला घ्यायला आले. मला माझ्या रामेश्वरी येथील घरी सोडून दिले. रात्रीच्या वेळी ऑटो उपलब्ध असले तरी सध्या सगळीकडे घडत असलेल्या घटना बघता एकटय़ा महिलेला ऑटोत जाणेही असुरक्षित वाटते. त्यामुळे पोलीस विभागाची ही योजना नक्कीच कौतुकास्पद आहे, अशी माहिती ज्योती बोरीकर यांनी दिली.

दहा किलोमीटर दूर असूनही घरी सोडून दिले 

आम्ही तिघी मैत्रिणी होतो. रात्री एका लग्नासाठी राज रॉयल लॉन कामठी रोड येथे गेलो होतो. मात्र, आम्हाला घरी जायला रात्री ११ वाजले. रात्री काहीच साधन मिळाले नाही. आमचे घर तिथून दहा किलोमीटर दूर होते. त्यामुळे मग पोलिसांना फोन केला. काही वेळात पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी आमच्यातील एका मैत्रिणीला मेडिकल चौकात आणि आम्हा दोघींना मानेवाडा येथे आमच्या घरी सोडून दिले. आमच्यासारख्या तरुण मुलींसाठी ही चांगली योजना असून सुरक्षित सेवा असल्याची माहिती पूजा यांनी दिली.