हुडकेश्वर पोलीस ठाण्याला घेराव पोलिसांचा लाठीमार
महादेव लँड डेव्हलपर्स, जे. एस. फायनान्स, श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट, मेसर्स वासनकर वेल्थ मॅनेजमेंट अशा कंपन्यांनी दामदुपटीच्या नावाखाली हजारो लोकांची कोटय़वधींनी फसवणूक केल्याचे प्रकार ताजे असताना पुन्हा एका कंपनीने गुंतवणुकीच्या नावाखाली हजारोंना कोटय़वधींचा गंडा घातला आहे. ही घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात उघडकीस आली आहे.
हेमलता राकेश चिरकुटे (३५, रा. आम्रपालीनगर, हुडकेश्वर) हिने दीड वर्षांपूर्वी हुडकेश्वर परिसरात ‘अलिना एम्प्लॉयमेंट रिसोर्सेस’ नावाची कंपनी सुरू केली. या कंपनीच्या माध्यमातून ती लोकांना घरबसल्या रोजगार देण्याचे आश्वासन देऊ लागली. त्यासाठी लोकांकडून १५ हजार रुपये नोंदणी शुल्क घेतले. त्यानंतर लोकांना एका चांगल्या पुस्तकातील लेख जसेच्या तसे कागदावर लिहिण्याचे काम दिले. महिन्यात तीनशे लिफाफे लिहून देणाऱ्या व्यक्तीला महिन्याला दहा हजार रुपये देऊ लागली. यातून लोकांमध्ये पैसे कमविण्याचे आकर्षण वाढले. त्यानंतर हेमलताने नवीन योजना सुरू करून १० हजारांपासून गुंतवणूक करा आणि सुरुवातीचे तीन महिने ४ हजार आणि नंतर ५ हजार रुपये परतावा देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे हातमजूर, कामगार, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, प्रौढ आदींनी १० हजारांपासून ते २० लाखांपर्यंत गुंतवणूक केली.
सुरुवातीला प्रत्येक व्यक्तीला व्यवस्थित परतावा मिळत गेला. त्यामुळे कंपनीचा प्रचार मोठय़ा झपाटय़ाने झाला आणि हजारो लोक कंपनीशी जुळले. लोकांच्या भोळेपणाचा फायदा घेण्यासाठी हेमलतानेही घराच्या समोरच एका इमारतीमध्ये कार्यालय भाडय़ाने घेतले. पाहतापाहता कंपनीचा विस्तार हुडकेश्वर, कुही, उमरेड, भंडारा, वर्धा, गडचिरोली या जिल्ह्यांत झाला. आज पाच हजारांवर लोकांनी कंपनीत कोटय़वधींची गुंतवणूक केली आहे. दामदुपटीच्या हव्यासापोटी शेकडो महिलांनी स्वत:कडचे दागिने तारण ठेवून, सावकाराकडून कर्ज काढून गुंतवणूक केली. परंतु गेल्या काही महिन्यांपासून हेमलताने लोकांना परतावा देणे बंद केले. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या तक्रारी वाढल्या.
काहींनी महिनाभरापूर्वी आर्थिक गुन्हे शाखा विभागाकडे तक्रारही केली. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी हुडकेश्वर पोलिसांना प्रकरणाची चौकशी करून लोकांनी गुंतवणूक न करण्यासाठी जनजागृती करण्याचे आदेश दिले. त्यामुळे हुडकेश्वर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अलिना एम्प्लॉयमेंट कंपनीच्या कार्यालयाच्या दारावर नोटीस चिटकविले. त्यामुळे हेमलताकडे दररोज येणारा पैशाचा ओघ थांबला आणि गुंतवणूकदारांनाही आपली फसवणूक झाल्याचे समजले. यानंतर हेमलताने आपले दुकान गुंडाळले आणि पोलिसांच्या नोटीसखाली आपली नोटीस लावली आणि गुंतवणूकदारांना शुक्रवारी सकाळी मुद्दल आणि परतावा देण्याचे आश्वासन दिले होते.

पाचशे कोटींच्या फसवणुकीचा अंदाज
हेमलता चिरकुटे हिने जवळपास पाच हजारांवर गुंतवणूकदारांना गंडविले. या प्रकरणात जवळपास पाचशे कोटींनी लोकांची फसवणूक झाली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम पवार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी हा कोटय़वधींनी फसवणुकीचा प्रकार असून लोकांच्या तक्रारीनंतरच निश्चित आकडा सांगता येईल, असे सांगितले.

पहाटे तीनपासून लोकांचा ‘हल्लाबोल’
हेमलताच्या नोटीसनुसार शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून गुंतवणूकदारांना पैशाचे वितरण होणार होते. त्यामुळे दोन ते तीन हजारांवर गुंतवणूकदारांनी पहाटे तीन वाजेपासूनच अलिना एम्प्लॉयमेंट रिसोर्सेस कंपनीच्या कार्यालयासमोर गर्दी केली. ही गर्दी बघून कार्यालयाच्या पाठीमागे राहणाऱ्या हेमलताने पोलिसांना स्वत:च्या घरी बोलवून घेतले. पोलीस पथक तिच्या घरी पोहोचले आणि चौकशी करू लागले. हेमलता कार्यालयात येत नसून पोलीस तिची बंद खोलीत चौकशी करीत असल्यामुळे नागरिक संतप्त झाले. त्यानंतर संतप्त जमावाने हेमलताला आपल्या स्वाधीन करण्याची मागणी पोलिसांना केली.

ठाण्याला चार तास घेराव
पोलीस हेमलताला घेऊन गेल्यानंतर जमावही त्यांच्या पाठीमागे ठाण्यात आला. दुपारी १२ वाजताच्या सुमारास हजारोंच्या जमावाने ठाण्याला घेराव घातला. जवळपास चार तास जमावाने पोलिसांना घेरले होते. त्यामुळे हुडकेश्वर, सक्करदरा, नंदनवन पोलीस ठाण्याचे पथक, दंगल विरोधी पथकाने दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार केला. त्यामुळे जमावातील लोकांच्या भावनांचा उद्रेक होऊन त्यांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली. यात प्रकाश लुंगे नावाचा शिपाई गंभीर जखमी झाला. यानंतर पोलिसांनी जमावावर लाठीमार करून त्यांना पांगविले.