बदली झाल्यानंतर पुन्हा जुन्याच ठिकाणी रुजू

पोलीस आयुक्तांच्या निर्देशांना केराची टोपली दाखवून हुक्का पार्लरला परवानगी देणाऱ्या अंबाझरी पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांऐवजी एका ‘चार्ली’चे राज्य सुरू आहे. पाच वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर इतरत्र बदली झाल्यावर ‘चार्ली’ने वशीला लावून पुन्हा अंबाझरीत ठाण्यातच बदली करून घेतली. सध्या नागपूर पोलीस दलात हे प्रकरण विशेष चर्चेत आहे.

पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी ‘ड्रग फ्री’चा नारा दिला. त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथकातर्फे काम करण्यात येत आहे. मात्र, अंमली पदार्थाची सवय जडवण्याचे काम हुक्का पार्लरमधून होते. अंबाझरी पोलीस ठाण्यांतर्गत सर्रासपणे अनेक हुक्का पार्लर सुरू आहेत. त्यात प्रामुख्याने वाईब, गुडगुड, कोपा, कर्बस्टोन, स्पॉट ९, नवाब, फिरंगी, विला ६५, एसआर, स्पीडस आदींचा समावेश आहे. त्याशिवाय अनेक सावजी हॉटेल्समध्ये अवैधपणे दारू पिण्याची परवानगी दिली जाते. त्याचप्रमाणे परिसरातील काही झोपडपट्टय़ांमध्ये अवैध दारू विक्री करण्यात येते व पांढराबोडी परिसरात मटका चालतो. या पोलीस ठाण्यांतर्गत अनेक बार व रेस्टॉरेंट नियम डावलून रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. या बाबींवर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. मात्र, पोलीस ठाण्यांतर्गत चालणाऱ्या अनेक अवैध व्यवसायांवर एका चार्लीचे नियंत्रण आहे. पोलीस निरीक्षकापासून ठाण्यातील अधिकाधिक अर्थव्यवहार तो सांभाळतो. सीताबर्डी पोलीस ठाण्यांतर्गत ‘चार्ली’ म्हणूनच काम केल्यानंतर त्याची बदली अंबाझरीत झाली. गेल्या पाच वर्षांपासून तो तेथे काम करतो. आता पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्याची बदली बजाजनगर पोलीस ठाण्यांतर्गत झाली होती. अंबाझरी पोलीस ठाणे परिमंडळ-२ अंतर्गत येत असून बजाजनगर पोलीस ठाणे परिमंडळ-१ अंतर्गत येते. मात्र, चार्लीने वशीला लावून बजाजनगरमधून स्वत:ला परिमंडळ-२ च्या उपायुक्त कार्यालयात संलग्न करून घेतले व आता तो अंबाझरीत पुन्हा रुजू झाला. अंबाझरी पोलीस ठाण्यात शंभरावर कर्मचारी आहेत. त्या ठिकाणी चार्लीचे काम करण्यासाठी एकही कर्मचारी कार्यक्षम नाही का, असा सवाल आता ठाण्यातील पोलीस कर्मचारी विचारू लागले आहेत. या चार्लीच्या बदली व पुन्हा परत येण्याची चर्चा सर्व पोलीस वर्तुळात सुरू असून त्याची तक्रार पोलीस आयुक्तांकडेही करण्यात आली आहे.

एकदा बदली झाल्यानंतर पुन्हा त्याच पोलीस ठाण्यात परत आला असेल तर त्याची चौकशी करून कारवाई केली जाईल. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही.   – डॉ. के. व्यंकटेशम, पोलीस आयुक्त.

दहा वर्षांपासून ‘चार्ली’ का?

चार्ली हा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात दुचाकीने फिरत असतो. त्यामुळे त्यांना पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे लोक, गुन्हेगार व अवैध धंद्यांची इत्थंभूत माहिती असते व पोलीस ठाण्याचे सर्व अर्थव्यवहार असाच व्यक्ती सांभाळत असल्याने ते वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अतिशय जवळचे असतात. हा चार्लीही असाच वरिष्ठांच्या जवळचा असून तो हुक्का पार्लर, बार व रेस्टॉरेंटचे अर्थकारण सांभाळतो.